हा तर आदित्य ठाकरेंचा पोरकटपणा, दीपक केसरकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:32 IST2025-07-10T15:31:07+5:302025-07-10T15:32:21+5:30
दिवस-रात्र मुंबई महापालिकेच्या पैशावर जगणारी माणसे

हा तर आदित्य ठाकरेंचा पोरकटपणा, दीपक केसरकर यांची टीका
सावंतवाडी : विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून शिक्षण खात्याबद्दल बोलणे माझ्या बद्दल बोलणे हा आदित्य ठाकरेंचा पोरकटपणा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. दिवसरात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोकं आहेत. मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचा दाखवा, असे आव्हान माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी उद्धवसेनेला दिले आहे, तसेच माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी, माझ्या तत्त्वांशी आहे. मी स्वतःहून कोणाच्याही अंगावर जात नाही अन् कोणी अंगावर आले तर सोडत नाही. त्यामुळे विनाकारण भानगडीत पडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
ते बुधवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केसरकर म्हणाले, यापूर्वी फक्त मागास विद्यार्थांना सोडून इतरांना गणवेश दिला जात नव्हता. ते सर्व विद्यार्थ्यांना मी मंत्री असताना द्यायला लावले. पुस्तकांचा बोजा कमी केला, नवीन प्रयोग करताना काही त्रुटी राहू शकतात. चांगल्या दर्जाचा कपडा मुलांना दिला जात नव्हता. माझ्या काळात ते दिले गेले.
मी उद्धव ठाकरे यांचा आजवर आदर केला; पण ज्यावेळी मी बोलायला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
अशा फालतू घोषणांना तिथल्या तिथे उत्तर देऊ शकलो असतो; पण ठाकरे घराण्याचा कमीपणा झाला असता. याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा करणार होतो. ही एक चांगली योजना आहे. शिक्षण खात्यात मी चांगले काम केले. मराठीला न्याय दिला आहे. राज ठाकरे नेहमी मराठीसाठी भांडतात. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा ते चालवत आहेत.
राणेंशी माझा वैयक्तिक वाद नव्हता
दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हते. राहायला जागा देत नव्हते, एवढा दरारा नारायण राणेंचा होता. बाळासाहेबांचा मुंबईत दारारा होता; पण इथून गोव्यात जावे लागत होते. जिल्ह्यात हे आले नाही, मी लढा दिला; पण त्यांनी युज ॲड थ्रो केले. राणेंशी माझा वैयक्तिक वाद नव्हता, असेही केसरकर म्हणाले.