Sindhudurg: चोरट्यांकडून वृद्ध महिलेचा खून, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:57 IST2025-11-11T11:54:45+5:302025-11-11T11:57:26+5:30
झटापटीत चोराने वृद्ध महिलेवर हल्ला केला

Sindhudurg: चोरट्यांकडून वृद्ध महिलेचा खून, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार
मालवण : तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
कट्टा खालची गुरामवाडी येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी चोरी करण्याच्या इराद्याने रोहिणी रमेश गुराम यांच्या घरात प्रवेश केला. या दरम्यान झालेल्या झटापटीत चोराने वृद्ध महिलेवर हल्ला केला. ज्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या.
हल्ला केल्यानंतर चोरटे तेथून पळून गेले. गंभीररीत्या जखमी असलेल्या गुराम यांना स्थानिक ग्रामस्थांनी पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चोरट्यांवर कारवाई करा
या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हल्ला करणारे चोरटे तत्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.