वैभववाडीत मेडिकल स्टोअरवर चोरट्यांचा डल्ला, पोलिस ठाण्यानजीकचीच घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 16:02 IST2023-12-19T16:01:51+5:302023-12-19T16:02:21+5:30
शहरातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

वैभववाडीत मेडिकल स्टोअरवर चोरट्यांचा डल्ला, पोलिस ठाण्यानजीकचीच घटना
प्रकाश काळे
वैभववाडी(सिंधुदुर्ग): वैभववाडी पोलिस ठाण्यालगतच असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. मेडिकल स्टोअरमधील तीन संगणक आणि सुट्टे पैसे चोरट्यांनी लंपास केले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पाठीमागे पोलिस ठाणे आणि समोरच संभाजी चौकात पोलिसांची गस्त असताना चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून शहरातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.
वैभववाडी शहरातील संभाजी चौकात आणि पोलिस ठाण्याच्या मधोमध 'अंकित मेडिकल स्टोअर' आहे. मेडिकल स्टोअरला जोडूनच डॉ. संजय मराठे यांचा दवाखाना आहे. या दवाखान्याच्या पाठीमागे पोलिस ठाणे आहे. चोरट्यांनी डॉ. मराठे यांच्या दवाखान्याचा मागील दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. दवाखान्यातील साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून टाकल्यावर त्यांनी अंकित मेडिकलचा आतील दरवाजा तोडला. मेडिकलमधील तीन संगणक आणि सुट्टे घेऊन जाताना मेडिकलमधील साहित्य विस्कटून टाकले.
दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. श्वान पथक, ठसेतज्ञांसह स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाही घटनास्थळी पोहोचले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस अधिक तपास करीत आहेत.