सावंतवाडीच्या ‘गंजिफा’, ‘दशावतार’ कलांना राष्ट्रीय सन्मान, पोस्ट तिकिटांवर झळकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:16 IST2025-10-10T16:16:40+5:302025-10-10T16:16:58+5:30
सावंतवाडीची कला-संस्कृती आता सातासमुद्रापार पोहोचणार

सावंतवाडीच्या ‘गंजिफा’, ‘दशावतार’ कलांना राष्ट्रीय सन्मान, पोस्ट तिकिटांवर झळकल्या
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानाच्या गौरवशाली कला-परंपरेला आज देशभरात पुनः एकदा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थानकालीन ‘गंजिफा’ कला आणि कोकणातील पारंपरिक ‘दशावतार’ कलेला भारतीय टपाल विभागाने विशेष पोस्ट तिकिटावर आणि गोलाकार पोस्टकार्डवर समाविष्ट करून नवीन उंची गाठली आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच चौकोनी न राहता गोलाकार स्वरूपातील पोस्टकार्ड प्रसिद्ध करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सावंतवाडीची कला-संस्कृती आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे.
भारतीय टपाल विभागाने सावंतवाडीच्या दोन महत्त्वपूर्ण लोककलांना हा सन्मान दिला आहे. या विशेष पोस्टकार्डवर दशावतार आणि गंजिफा कलेचे सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. दशावतार ही कोकणातील जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून, येथील लोकांच्या जीवनात खोलवर रुजलेली पारंपरिक लोककला आहे. एकेकाळी ही गंजिफा कला केवळ राजघराण्यांच्या दरबारात खेळली जात होती, आता ती देशाच्या पोस्ट तिकिटांवर झळकत आहे, ही बाब सावंतवाडीसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला राजघराण्याच्या उपस्थितीमुळे मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सावंतवाडी संस्थानचे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, लखमराजे भोसले आणि श्रद्धाराणी भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.