Sindhudurg ZP Election Results 2026: सिंधुदुर्गात 'राणें'चाच डंका! महायुतीची एकहाती सत्ता; ५० पैकी ४७ जागांवर विरोधकांचे डिपॉझिट जप्त
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 9, 2026 17:22 IST2026-02-09T17:21:23+5:302026-02-09T17:22:21+5:30
उद्धवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

Sindhudurg ZP Election Results 2026: सिंधुदुर्गात 'राणें'चाच डंका! महायुतीची एकहाती सत्ता; ५० पैकी ४७ जागांवर विरोधकांचे डिपॉझिट जप्त
सिंधुदुर्ग : कोकणच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीने विरोधकांचा पार धुरळा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. एकूण ५० पैकी तब्बल ४१ जागा जिंकत महायुतीने जिल्ह्यावर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. या विजयाने ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य असल्याचे सिद्ध केले असून, संपूर्ण जिल्ह्यात 'राणे' नावाचाच करिश्मा पाहायला मिळाला.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २७ जागा पटकावून स्वबळावर बहुमताचा टप्पा पार केला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १४ जागांवर यश मिळवले आहे. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, ६ अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली असून, यात भाजप व शिंदेसेनेच्या बंडखोरांचा भरणा आहे.
'राणे' फॅक्टर पुन्हा सुसाट!
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही खासदार नारायण राणे यांची जादू कायम असल्याचे दिसून आले. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही प्रमुख तालुक्यांत राणे समर्थकांनी विरोधकांना धोबीपछाड दिली. "सिंधुदुर्गची विकासकामे आणि राणे कुटुंबावरील विश्वास" या जोरावरच हे यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बालेकिल्ल्यात 'मशाल' विझली!
एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व राखणाऱ्या उद्धवसेनेसाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा आहे. ७ तालुक्यांपैकी अनेक ठिकाणी या गटाला साधे खातेही उघडता आले नाही. केवळ ३ जागांवर विजय मिळाल्याने जिल्ह्यातील उद्धवसेनेच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पक्षीय बलाबल
एकूण जागा - ५०
- भाजप - २७
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - ००
- शिंदेसेना - १४
- काँग्रेस - ००
- उद्धवसेना - ०३
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - ००
- इतर - ०६