सिंधुदुर्ग : एसटी प्रशासनाने उतरविलेले होर्डिंग्ज तेथेच पडून, हितवर्धक संघाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:13 PM2018-10-24T12:13:45+5:302018-10-24T12:15:35+5:30

सावंतवाडी येथील एसटी बसस्थानक परिसरात धोकादायक असलेले होर्डिंग्ज सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने उतरविले खरे, मात्र काढलेले होर्डिंग्ज त्याच ठिकाणी टाकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या या प्रशासनावर प्रवासीवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sindhudurg: The hoardings of the STs were broken down there, the magnificent team's bump | सिंधुदुर्ग : एसटी प्रशासनाने उतरविलेले होर्डिंग्ज तेथेच पडून, हितवर्धक संघाचा दणका

होर्डिंग्ज उतरवून ते तेथेच टाकण्यात आले आहेत. (रुपेश हिराप)

Next
ठळक मुद्देएसटी प्रशासनाने उतरविलेले होर्डिंग्ज तेथेच पडून, हितवर्धक संघाचा दणका स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या प्रशासनाबाबत प्रवाशांतून नाराजी

सावंतवाडी : येथील एसटी बसस्थानक परिसरात धोकादायक असलेले होर्डिंग्ज सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्या दणक्यानंतर एसटी प्रशासनाने उतरविले खरे, मात्र काढलेले होर्डिंग्ज त्याच ठिकाणी टाकल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या या प्रशासनावर प्रवासीवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पुणे येथे रस्त्यालगत असलेला होर्डिंग कोसळून रिक्षा चालकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र या घटनेतून बोध घेत सावंतवाडी शहर हितवर्धक संघाच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश भोगटे व अफरोज राजगुरु यांच्यासह नागरिकांनी सावंतवाडी बसस्थानकावरील धोकादायक होर्डिंग्ज संदर्भात आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांची भेट घेत होर्डिंग्ज तत्काळ हटविण्यास सांगितले होते. त्यावेळी नागरिकांची मागणी लक्षात घेता एसटी प्रशासनाने ते उतरविले होते. मात्र हे होर्डिंग्ज काढल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी त्या ठिकाणीच ते टाकल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.

हितवर्धक संघाने होर्डिंग्जबरोबर परिसरातील अस्वच्छतेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करत सय्यद यांना धारेवर धरले होते. याशिवाय ज्या ठेकेदाराने स्वच्छतेबाबत ठेका घेतला, त्याच्याकडून परिसर स्वच्छ करून घेण्याची मागणी केली होती. मात्र परिसर स्वच्छ करणे सोडाच, पण होर्डिंग्ज खाली काढून ते त्या ठिकाणीच टाकून स्वच्छतेच्या बाबतीत आपण किती गंभीर आहोत, हे उदाहरण त्यांनी दाखवून दिले.

दुसऱ्या बाजूने विचार करता काढलेल्या होर्डिंग्जची लोखंडी कमान त्या ठिकाणीच उभी असल्याने भविष्यात त्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही कमान हलविल्यास भविष्यातील धोका टळू शकतो.

...तर पुन्हा घेराव घालणार

आगार व्यवस्थापक सय्यद यांनी आम्हा नागरिकांना दिलेली आश्वासने पाळावीत. होर्डिंग्जची त्वरित विल्हेवाट लावावी. याशिवाय लोखंडी कमानीबाबत निर्णय घ्यावा. स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा आढळून आल्यास पुन्हा घेराव घालू. ज्याप्रमाणे होर्डिंग्ज काढण्याची तत्परता दाखविली त्याप्रमाणे ती उचलण्यात दाखवावी, अशा इशारा हितवर्धक संघाचे अध्यक्ष सुरेश भोगटे यांनी दिला.
 

Web Title: Sindhudurg: The hoardings of the STs were broken down there, the magnificent team's bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.