सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुणगे शाखा व्यवस्थापकाने जीवन संपविले, कारण गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:26 IST2025-11-27T15:25:42+5:302025-11-27T15:26:46+5:30
आरे येथील तळ्यात मृतदेह आढळला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुणगे शाखा व्यवस्थापकाने जीवन संपविले, कारण गुलदस्त्यात
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुणगे शाखा व्यवस्थापक अविनाश काशिराम तळवडेकर (५१, मूळ रा. आरे, बौद्धवाडी, सध्या रा. मुणगे) यांनी आरे, जेठेवाडी येथील कौल कारखान्यानजीक असलेल्या तळ्यात आत्महत्या केली. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरे, बौद्धवाडी येथील मूळ रहिवासी अविनाश तळवडेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुणगे शाखेत व्यवस्थापक म्हणून गेली दीड वर्षे कार्यरत होते. कामानिमित्त ते मुणगे येथेच पत्नीसमवेत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास घरी आलेल्या अविनाश तळवडेकर यांनी पत्नी सुनीता हिला ''बँकेत जाऊन येतो'', असे सांगून ते घरातून निघून गेले.
रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते न सापडल्याने त्यांची पत्नी सुनीता यांनी २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:२० वाजण्याच्या सुमारास देवगड पोलिस स्थानकात ते बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.
तळ्यात मृतदेह तरंगताना आढळला
दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास आरे, जेठेवाडी येथील कौल कारखान्यानजीक अविनाश तळवडेकर यांची दुचाकी व मोबाइल आढळून आला. तसेच तेथील तळ्यात त्यांचा मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांना आढळून आला. या घटनेची माहिती आरे, पोलिसपाटील राजेंद्र बाबाजी कदम (रा. आरेश्वरवाडी) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. देवगडचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, उपनिरीक्षक संतोष भालेराव, हवालदार आशिष कदम, महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. घटनेचा तपास पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.