ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:33 IST2022-11-21T13:33:03+5:302022-11-21T13:33:33+5:30
शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत असताना विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश
कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ मुस्लिमवाडीसह गावातील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
कलमठ मुस्लिमवाडी येथील सोनू शेख, बाबूल शेख, विजय खरात, प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केला. प्रवेशकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपमध्ये स्वागत केले. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून हा प्रवेश घडून आला. कलमठ मुस्लिमवाडी मधील अनेकांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत असताना विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
या प्रसंगी सोनू शेख, बाबुल शेख, प्रवीण मोरे, विजय खरात, अस्लम शहा यांच्यासह तब्बल ६० जणांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री, राजू गवाणकर आदि उपस्थित होते. आमदार नीतेश राणे यांनी यावेळी प्रवेशकर्त्यांचे आभार मानले.