Local Body Election: युतीसाठी सकारात्मक, मात्र..; शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकरांनी मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:32 IST2025-11-15T17:31:14+5:302025-11-15T17:32:01+5:30
Local Body Election: भाजप पदाधिकार्यांच्या वक्तव्यावर नाराजी

Local Body Election: युतीसाठी सकारात्मक, मात्र..; शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकरांनी मांडली स्पष्ट भूमिका
सावंतवाडी : युती होण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. भाजप व शिंदेसेना या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवू अशी भूमिका शिंदेसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी मांडली. ते शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मालवणात भाजप पदाधिकार्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिंदेसेनेचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना समज देण्यात यावी अशी मागणी केली.
केसरकर म्हणाले, युती होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अद्यापही बोलणी सुरू आहेत. याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. मात्र नेमकी आतापर्यंत भूमिका वरिष्ठांनी जाहीर केलेली नाही. त्यामुळे आताच मी यावर अधिकृत काही बोलू शकत नाही. परंतु सर्व बाजूने प्रयत्न सुरू आहेत. युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. त्या दृष्टीने सर्व उमेदवारांनी आपापले फॉर्म भरले आहेत. चर्चा होईपर्यंत थांबणे चुकीचे ठरणार आहे.
मालवण येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका करण्यात आली होती. याबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, असे कोण म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. मालवण- कुडाळ मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बोलताना तारतम्य पाळणे गरजेचे आहे. शिंदे सेनेचे अस्तित्व नाही, असे बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी टोकाचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. याबाबत त्यांना वरिष्ठाने समज द्यावी, असे सांगून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदेसेनेकडून अँड निता सावंत-कविटकर यांचे नाव जाहीर
नगरपालिकेसाठी शिंदे सेनेच्या माध्यमातून सर्व उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र आयत्यावेळी युती झाली तर काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे लागतील तशी त्यांना कल्पना देण्यात आली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी ॲड. निता कविटकर-सावंत यांचे नाव ठरल्याचे यावेळी केसरकर यांनी जाहीर केले. रविवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.