Sindhudurg: बँकेत अधिकारी असल्याची बतावणी, कमी किंमतीत मोटार देतो म्हणाला; सेवानिवृत्त अभियंत्याला पावणे पाच लाखांचा गंडा घातला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:24 IST2025-07-05T17:22:53+5:302025-07-05T17:24:25+5:30
संशयिता विरोधात गुन्हा दाखल

Sindhudurg: बँकेत अधिकारी असल्याची बतावणी, कमी किंमतीत मोटार देतो म्हणाला; सेवानिवृत्त अभियंत्याला पावणे पाच लाखांचा गंडा घातला
कणकवली : कणकवली शहरातील एका लॉजमध्ये झालेल्या ओळखीनंतर विश्वास संपादन करत आपण एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी असल्याची बतावणी करत गाड्यांच्या लिलावातील मोटार कमी किमतीत घेवून देतो असे सांगत एका वृध्द सेवानिवृत्त अभियंत्याची ४ लाख ८० हजार रोख रक्कम घेवून फसवणूक केली. याप्रकरणी संशयित प्रियंक एस. आंगणे (५०, रा. आंगणेवाडी) याच्यावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ ते १८ मार्च २०२५ दरम्यान घडली. याबाबत रतनकुमार मनोज सावंत (वय-७४,रा. भिरवंडे, बिवणेवाडी, सद्या रा.नवी मुंबई) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, रतनकुमार सावंत हे सेवानिवृत्त अभियंता असून त्यांची वैभववाडी-जांभवडे येथे शेतजमिन आहे. ते शेतीच्या कामासाठी गावी येतात. १० मार्च रोजी ते गावी आले होते. त्यावेळी त्यांची संशयित प्रियंक आंगणे याच्याशी ओळख झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईत मुख्य कार्यालयात आपण प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे असेही सांगितले. त्यावेळी सावंत यांनी आपल्याला मोटारीची आवश्यकता असल्याचे त्याला सांगितले.
त्यावर संशयित आंगणे याने बँकेचे कर्ज थकलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्री लिलावामध्ये तुम्हाला कमी किमतीत गाडी घेवून देतो असे सांगितले. त्यानंतर सावंत यांनी आंगणे याला ३ लाख ९० हजार रुपये दिले. त्यानंतर आणखी पैसे लागतील असे सांगितल्यानंतर ९० हजार रुपये असे एकूण ४ लाख ८० हजार रुपये दिले.
त्याने या गाड्यांचा लिलाव वाशी डेपो येथे केला जातो, तेथे तुम्हाला गाडी घेण्यासाठी बोलवेन असे सांगून तो मुंबईला निघून गेला. त्यानंतर सावंत यांनी आंगणे याला वारंवार फोनद्वारे आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून गाडीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने कारणे सांगून टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रतनकुमार सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात प्रियंक आंगणे याच्याविरुध्द तक्रार दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.