रत्नागिरीत चालकांनीच रोखली कोचुवेली रेल्वे

By Admin | Updated: January 10, 2015 00:27 IST2015-01-09T23:45:28+5:302015-01-10T00:27:31+5:30

रत्नागिरीपर्यंत रेल्वे गाड्या घेऊन आलेल्या मध्य रेल्वेच्या चालक व गार्डस्ना या पोलिसांनी संरक्षण दिले होते.

Rakhali Kochuveli Railway with Ratnagiri drivers | रत्नागिरीत चालकांनीच रोखली कोचुवेली रेल्वे

रत्नागिरीत चालकांनीच रोखली कोचुवेली रेल्वे

रत्नागिरी : कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या चालक (लोको-पायलट) व गार्डस्मधील गेल्या काही काळापासून सुरू असलेला क्षेत्राचा वाद चिघळला आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी-रोहा मार्गावरील गाड्यांमध्येही कोकण रेल्वेचेच चालक व गार्डस् हवेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी स्थानकात आज, शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता कोकण रेल्वेच्या सुमारे ५०पेक्षा अधिक चालक, गार्डस्नी निदर्शने करीत गुजरातकडे जाणारी कोचुवेली-भावनगर रेल्वे रोखली. त्यामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोकण रेल्वेचे क्षेत्र रोह्यापर्यंत असताना मध्य रेल्वेचे चालक, गार्ड रत्नागिरीपर्यंत येतात. या मार्गावरही कोकण रेल्वेचेच चालक व गार्ड रेल्वेमध्ये असायला हवेत, अशी कोकण रेल्वे चालकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकावर काही काळ गोंधळ निर्माण झाला. निदर्शनकर्त्या चालक व गार्डस्च्या हाती झेंडे होते. मागणीसाठी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी राज्य राखीव दलाचे सुमारे ५० पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
रत्नागिरीपर्यंत रेल्वे गाड्या घेऊन आलेल्या मध्य रेल्वेच्या चालक व गार्डस्ना या पोलिसांनी संरक्षण दिले होते. त्यानंतर हे आंदोलन समाप्त झाले. या आंदोलामुळे मध्य रेल्वे व कोकण रेल्वेच्या चालक, गार्डस्मधील वाद येत्या काळात अधिकच चिघळण्याची शक्यता असून, याबाबत रेल्वेमंत्री प्रभू यांनीच मार्ग काढण्याची मागणी होत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Rakhali Kochuveli Railway with Ratnagiri drivers