One injured in ST-Tempo accident, major damage to both vehicles | एसटी-टेम्पो अपघातात एक जखमी,दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

शिरगांव राक्षसघाटी येथे झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

ठळक मुद्देएसटी-टेम्पो अपघातात एक जखमी,दोन्ही वाहनांचे मोठे नुकसानशिरगांव राक्षसघाटीतील घटना, जखमी कोल्हापूरातील

शिरगांव : देवगड-नांदगाव मार्गावर शिरगांव येथे राक्षसघाटी वळणावर एसटी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात टेम्पो चालक नजीर बापू मुल्ला (३०, रा. कोल्हापूर, कदमवाडी) हा युवक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजता घडला.

देवगड आगारातून सकाळी ८.४० वाजता सुटलेली देवगड-कणकवली ही एसटी बस शिरगांव राक्षसघाटीच्या वळणावर आली असताना कणकवलीहून आॅनलाईन कुरियर कंपनीचे सामान घेऊन देवगडकडे जाणाऱ्या टेम्पोचे चालक नजीर मुल्ला यांना वळणाचा अंदाज न आल्याने विरुद्ध दिशेने जात एसटी बसला समोरून त्यांनी धडक दिली.

देवगड-नांदगाव मार्गावर शिरगांव राक्षसघाटी येथे नागमोडी वळणांचा रस्ता असून रस्त्याच्या एका बाजूस खोल दरी आहे. समोरून येणारा टेम्पो चुकीच्या बाजूने एसटीच्या दिशेने येत असल्याचे समजताच एसटीचे चालक मंगेश जाधव यांनी प्रसंगावधान राखून एसटीचा वेग कमी करून एसटी बस उभी केली. अन्यथा मोठा अपघात घडला असता. या अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टेम्पोची काच फुटल्याने चालक नजीर मुल्ला याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्याच्यावर शिरगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. एसटीतून प्रवास करणाºया २५ प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

देवगड आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण, स्थानकप्रमुख गंगाराम गोरे, वाहतूक नियंत्रक टी. एस. देवरूखकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. शिरगांव पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार तुकाराम पडवळ, कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे, शिरगांव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

 

Web Title: One injured in ST-Tempo accident, major damage to both vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.