Sindhudurg Crime: डिजिटल अरेस्टप्रकरणी यूपीतील एकास अटक; १२ लाखांची रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:06 IST2025-12-25T18:06:38+5:302025-12-25T18:06:55+5:30
ओरोस (जि. सिंधुदुर्ग ) : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आरोपीला अटक ...

Sindhudurg Crime: डिजिटल अरेस्टप्रकरणी यूपीतील एकास अटक; १२ लाखांची रक्कम जप्त
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता (३३, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून १२ लाख रुपयांची फसवणुकीची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
कणकवली पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३२३/२०२५ अन्वये माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमांखाली तपास सुरू होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल ट्रेसिंग व बँक व्यवहारांचा सखोल अभ्यास करत संशयित आरोपीचा माग काढला. तपासात गुप्ता याने स्वतःला कायदा अंमलबजावणी यंत्रणेशी संबंधित असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
अखेर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून त्याला अटक केली. आरोपीकडून जप्त रकमेबाबत तसेच या गुन्ह्यातील इतर सहआरोपी, आर्थिक साखळी आणि वापरलेली डिजिटल साधने यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.