कोकणातील सेतू कार्यालये चालवण्याचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला; नितेश राणे म्हणाले, "मी इथे बसलोय ना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:16 IST2025-02-26T15:12:16+5:302025-02-26T15:16:33+5:30

सिंधुदुर्ग जिह्यातील सेतू सुविधा केंद्रे चालवण्याचे कंत्राट महायुती सरकारने गुजरातमधील कंपनीला दिले आहे.

Nitesh Rane reaction after the contract to run Setu Suvidha Kendras in Sindhudurg district was awarded to Gujarat based company | कोकणातील सेतू कार्यालये चालवण्याचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला; नितेश राणे म्हणाले, "मी इथे बसलोय ना..."

कोकणातील सेतू कार्यालये चालवण्याचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला; नितेश राणे म्हणाले, "मी इथे बसलोय ना..."

Sindhudurg Setu Suvidha Kendra: राज्यातील उद्योगधंदे गुजरातला जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू कार्यालय गुजरातमधील कंपनी चालवणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्राचा कंत्राट गुजरात येथील एका कंपनीला देण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. यावर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही असं म्हटलं. गुजरातवर टीका करणाऱ्या लोकांच्या मालकाचा मुलगा गुजराती लोकांच्या लग्नात नाचत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र चालवण्याची जबाबदारी गुजरातची कंपनी असलेल्या गुजरात इन्फोटेककडे देण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी याच कंपनीकडे सेतू कार्यालय चालवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.  त्यामुळे सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनीमार्फत चालवण्यात येणार ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे. तर सत्ताधारी गुजरातच्या अधिपत्त्याखाली असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

"सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुजरात इन्फोटेकला हे काम देण्यात आलं आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. आता त्यांच्याकडून कमी पगारावर काम करणाऱ्यांना नेमण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व आता गुजरातला देण्याचा डाव शासनाचा आहे. इथल्या सत्ताधाऱ्यांनी जमलं तर त्याकडे लक्ष द्यावं. कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत," अशी टीका वैभव नाईक यांनी केली. वैभव नाईक आणि विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"ते कार्यालय चालवणारे मराठी आहेत. मी इथे बसलेलो आहे ना. माझ्या इथल्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा, रोजगार कसा मिळवून द्यायचा त्यासाठी नितेश राणे पालकमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझ्या स्थानिक भूमीपुत्रांवर कोणीही अन्याय करू शकणार नाही. जे गुजरातवर आक्षेप घेत आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना पहिले जाऊन सांगावं की त्यांच्या मुलाला गुजराती लोकांच्या लग्नामध्ये नाचायला बंद करायला सांगावं. मी जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास देतो कंपनी कुठलीही असो जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच त्या सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिले जाईल," असं मंत्री नितेश राणे म्हणाले.

Web Title: Nitesh Rane reaction after the contract to run Setu Suvidha Kendras in Sindhudurg district was awarded to Gujarat based company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.