वैभव नाईक शिंदेसेनेत आल्यास नीलेश राणे स्वागतच करतील; मंत्री उदय सामंतांनी दिली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:10 IST2025-04-25T16:03:23+5:302025-04-25T16:10:58+5:30
कुडाळ : सिंधुदुर्गात उद्धवसेनेत फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक हे शिंदेसेनेत आले ...

वैभव नाईक शिंदेसेनेत आल्यास नीलेश राणे स्वागतच करतील; मंत्री उदय सामंतांनी दिली ऑफर
कुडाळ : सिंधुदुर्गात उद्धवसेनेत फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक हे शिंदेसेनेत आले तर आमदार नीलेश राणे हे ही त्यांचे पक्षात स्वागत करतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत व्यक्त करत वैभव नाईक यांना पक्षात येण्याचे थेट आमंत्रण दिले.
शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुडाळ येथे आभार मेळावा सुरू होण्याअगोदर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभासद नोंदणीसाठी आलो होतो. भाजपाचा कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता आम्ही आमच्या पक्षात घेतला नाही. तरीही भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांशी अगोदर बोलून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी सावंत यांना दिला.
उद्धवसेनेचे दीड हजार कार्यकर्ते शिंदेसेनेत येणार
ते म्हणाले, काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेमुळे कुडाळ येथील जो आभार मेळावा होता तो अत्यंत साध्या पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यासाठी येणारे राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते एकनाथ शिंदे यांचेही साध्या पद्धतीने स्वागत करणार आहोत. या मेळाव्यात उद्धवसेनेचे सुमारे दीड हजारच्या वर पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
मंत्री नितेश राणेही माझ्या मतदारसंघात येतात
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाच्या सभासद नोंदणीसाठी आलो. महायुतीतील भाजपा तसेच इतर मित्रपक्षांच्या कोणत्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मी पक्षप्रवेश घेतला नाही. तरीही त्यावेळी मी केलेल्या भाषणाचा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गैरसमज करून घेतला. पालकमंत्री नितेश राणे हेही माझ्या मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी येतात, ते पक्षाचे काम आहे. यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही, असे त्यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसीमधील कामांची चौकशी
कुडाळ एमआयडीसीमध्ये जे ८० लाखांचे काम करण्यात आले, त्या कामाची मी चौकशी लावणार आहे. काम चांगले झाले नाही तर परत काम करून घेणार, असा इशाराही सामंत यांनी दिला. कुडाळ जुनी एमआयडीसी असून, पर्यटन जिल्हा झाल्यानंतर येथील निकष बदलले. त्यामुळे आता आडाळी येथे जी एमआयडीसी सुरू केली आहे त्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.