Maharashtra Elections 2019 : Rane ranks in Karnavali; Shiv Sena-BJP will contest elections | Maharashtra Elections 2019 : कणकवलीत राणेंची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना-भाजपमध्येच होणार चुरशीच्या लढती
Maharashtra Elections 2019 : कणकवलीत राणेंची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना-भाजपमध्येच होणार चुरशीच्या लढती

- महेश सरनाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढती या राज्यातील सत्ताधारी शिवसेना विरूद्ध भाजप या दोन पक्षांमध्येच होणार आहेत. जागा वाटपात भाजपाच्या वाट्याला आलेल्या कणकवली मतदारसंघात शिवसेनेने अधिकृत उमेदवार उभा केल्याने शिवसेना आणि भाजप युतीमध्ये फूट पडली आहे.
नारायण राणे यांचे सुपुत्र माजी आमदार नीतेश राणे यांना रोखण्यासाठी शिवसेनेने राणेंचेच समर्थक सतीश सावंत यांना उमेदवारी दिल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. तर दोन वेळा आमदार झालेल्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची हॅट्ट्रिक हुकविण्यासाठी भाजप बंडखोर प्रदेश चिटणीस राजन तेली आणि केसरकर यांचे समर्थक असलेल्या बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी दाखल केल्याने सावंतवाडीतील लढाई आता तिरंगी आणि चुरशीची बनली आहे. दीपक केसरकरांसाठी लावण्यात आलेल्या चक्रव्यूहात ते फसतात की विजयाची पताका फडकवितात, याकडे सर्व जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कणकवली मतदारसंघात काँग्रेसकडून आमदारकीची पहिली टर्म पूर्ण करणाºया नीतेश राणेंनी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. या निवडणुकीत नारायण राणे प्रत्यक्षात उमेदवार नसले तरी त्यांच्या चिरंजीवांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने युतीचा धर्म बाजूला सारत राणेंचे समर्थक जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारीही दिली आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. वाटेल ते झाले तरी राणेंचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. या लढाईत राणेंसोबत आता भाजपाही असल्याने राणे-भाजपा विरूद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे. तर कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक आणि अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. केवळ सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीने बबन साळगावकर यांना उमेदवारी देऊन रंगत आणली आहे. तर कणकवली आणि कुडाळ मतदारसंघात काँग्रेसने अगदी नावाला उमेदवार उभे केले असल्याने ते लढतीत मागे पडले आहेत.

प्रचारातील चर्चेचे मुद्दे
कणकवली मतदारसंघात दोन्ही उमेदवार पक्षांतर केलेले असल्याने आणि एकमेकांचे सोबती असल्याने वैयक्तिक टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
युती शासनाच्या कालावधीत गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री असताना केसरकर यांनी शासनाच्या निधीचा योग्य वापर न केल्याचा मुद्दा त्यांचे विरोधक मोठ्या प्रमाणावर प्रचारात घेणार आहेत.
रखडलेले विमानतळ, पाटबंधारे प्रकल्प आणि तरुणांना रोजगार नसल्यामुळे होणारे स्थलांतर हादेखील प्रचारात प्रमुख मुद्दा असेल.

Web Title: Maharashtra Elections 2019 : Rane ranks in Karnavali; Shiv Sena-BJP will contest elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.