कोकणच्या राजकारणात 'धडाका'! सतीश सावंत यांच्या हाती 'कमळ'; ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 21:41 IST2026-02-01T21:37:32+5:302026-02-01T21:41:06+5:30
कणकवलीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कोकणच्या राजकारणात 'धडाका'! सतीश सावंत यांच्या हाती 'कमळ'; ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार
कणकवली :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर 'मशाल' सोडून 'कमळ' हाती घेतले आहे. रविवारी कणकवलीतील हरकुळ खुर्द येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ झाली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत, मनोज रावराणे, बबलू सावंत यांसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. सावंत यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, विविध गांवांचे सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.
जुने ऋणानुबंध पुन्हा जागले!
सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, मधल्या काळात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये परतल्याने "घरवापसी की नवी खेळी?" अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा सुरुंग
सतीश सावंत हे केवळ नेते नसून ठाकरे शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत हरकुळ खुर्दचे सरपंच आनंद ठाकूर, भिरवडे सरपंच नितीन सावंत आणि बेनी डिसोझा यांसारख्या महत्त्वाच्या मोहऱ्यांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाची स्थानिक फळी खिळखिळी झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच झालेली ही गळती पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
सहकार क्षेत्रातील समीकरणे बदलणार
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून सतीश सावंत यांचा सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्हा बँक, विविध विकास सोसायट्या आणि ग्रामीण भागातील अर्थकारणावर भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट होणार आहे. विकासकामांच्या जोरावर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आम्ही सतीश सावंतांचे स्वागत करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.