माझे नाव काय माहीत आहे ना...; राणेंना चक्रव्यूह भेदणे अवघड नाही; नितेश राणेंचा विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:35 IST2025-11-20T19:34:56+5:302025-11-20T19:35:35+5:30
Local Body Election: मराठी भाषा येत नाही म्हणून हसता, पण..

माझे नाव काय माहीत आहे ना...; राणेंना चक्रव्यूह भेदणे अवघड नाही; नितेश राणेंचा विरोधकांना इशारा
सावंतवाडी : माझे नाव काय माहीत आहे ना...नितेश नारायण राणे. त्यामुळे राणेंना चक्रव्यूह भेदणे काही अवघड नाही, असे सांगत कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आपल्या विरुद्ध एकवटलेल्या विरोधकांना पालकमंत्री नितेश राणे यांनी राणे स्टाइल उत्तर दिले.
नीलेश राणे हे शिंदेसेनेत आपल्या पक्षाशी प्रामाणिक काम करत आहेत. ते आज जरी महाविकास आघाडीसमवेत असले तरी आपल्या पक्षाशी प्रामाणिक काम करत आहेत. ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षाशी प्रामाणिक काम करावे, अशी राणेंची शिकवण आहे. आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. आम्ही मॅच्युअर्ड आहोत त्यामुळे कोणी लक्ष देण्याची गरज नाही, असा टोमणा त्यांनी लगावला.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. बुधवारी (दि. १९) येथील पाटेकर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. या वेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले, लखमसावंत भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, मंदार कल्याणकर, संध्या तेरसे, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
स्त्रीची बदनामी करण्याचा कोणाला अधिकार नाही
मंत्री राणे म्हणाले, विरोधी पक्षाकडून कितीही टीका झाली तरी आम्ही त्याला उत्तर देणार नाही. मी टीका करून मते मागणार नाही. विरोधक टीका करतात. आमच्या उमेदवारांच्या बदनामीचे प्रयत्न करतात. पण मी एक सांगतो निवडणूक येईल आणि जाईल, कुठल्या स्त्रीची बदनामी करण्याचा अधिकार कुणाला दिला नाही. आपल्याही माता, भगिनी आहेत हेही बदनामी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
मराठी भाषा येत नाही म्हणून हसता, पण त्यांनी लग्न होऊन सावंतवाडीच्या सूनबाई झाल्यानंतर मराठी शिकण्याचा प्रयत्न केला. आज त्या चांगल्या मराठी बोलत आहेत. पण काही जण त्यांना ट्रोल करण्याचे काम करतात. ट्रोल करणाऱ्यांनी त्या मराठी शिकतात, उच्चशिक्षित आहेत हे मात्र पाहिले नाही.