सागरी जीवसृष्टीवर होणारे विपरीत परिणाम चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:19 IST2025-10-04T18:15:54+5:302025-10-04T18:19:38+5:30
वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतोय, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणामही होत आहेत.

संग्रहित छाया
संदीप बोडवे
मालवण : सागरी प्रजाती ही आपली मौल्यवान संपत्ती आहे आणि मालवणसारखी किनारपट्टी पर्यटनाचे आकर्षण केंद्र झाली आहे. येथे स्कूबा डायव्हिंग, कोरल रीफ्स आणि ऐतिहासिक स्थळांमुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतोय, ही सकारात्मक बाब आहे.
मात्र, पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणामही होत आहेत. प्लास्टिक कचरा, जलप्रदूषण, बोटींचा आवाज आणि तेलगळती यामुळे पर्यावरणीय तणाव वाढत आहे. सागरी जीवसृष्टीवर होणारा हा विपरीत परिणाम चिंताजनक आहे आणि त्यांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. पर्यटन आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणे ही काळाची गरज ठरली आहे.
दरवर्षी १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जाणारा वन्यजीव सप्ताह हा केवळ वाघ, हत्ती, पक्षी यांच्यापुरता मर्यादित नसून आपल्या सागरी जीवसृष्टीचा देखील समावेश आहे.
मालवण मरीन सेंच्युरी : एक आशेचा किरण :
मालवण मरीन सेंच्युरी ही महाराष्ट्रातील एकमेव मरीन सेंच्युरी असून तिथला उद्देश समुद्री जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षित क्षेत्र तयार करणे आहे. येथे आढळणारे कोरल रीफ्स, समुद्री कासव, विविध मासे, समुद्री पक्षी आणि समुद्रातील वनस्पती यांचे संरक्षण केंद्रस्थानी आहे. जर योग्य नियोजन, प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या सहभागाने ही सेंच्युरी विकसित
केली गेली, तर ती पर्यटन आणि संरक्षण यामध्ये समतोल साधणारी एक आदर्श मॉडेल योजना ठरू शकते.
स्थानिक समुदायाची भूमिका :
मालवणमधील स्थानिक मच्छीमार, व्यवसायिक आणि युवक जर पर्यावरणसंवेदनशील पर्यटनासाठी पुढे आले, तर संपूर्ण समुद्री परिसंस्थेचे संरक्षण शक्य आहे. स्थानिक पातळीवर
खालील उपक्रम राबवता येतील :
- सागरी स्वच्छता मोहीम
- शाळांमधील पर्यावरण शिक्षण वाढवणे
- सामुदायिक ‘नो-प्लास्टिक’ निर्णय घेणे
- इको-फ्रेंडली बोटींचा वापर करणे.
प्रदूषणाचे वाढते संकट व त्याचे परिणाम :
प्लास्टिक कचरा : पर्यटकांनी वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या थेट समुद्रात फेकल्या जातात, ज्यामुळे मासे, कासव आणि इतर सागरी जीव यांचा वरतीचा बळी पडतो.
तेलगळती : टुरिस्ट आणि मच्छीमार बोटीमधून समुद्रात होणारी इंधनाची गळती जलप्रदूषणास कारणीभूत ठरते.
ध्वनिप्रदूषण : जलक्रीडा, बोटींचा आवाज आणि लाउडस्पीकरमुळे सागरी प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण होतो.
कोरल रीफ्सचा ऱ्हास : स्कूबा डायव्हिंग आणि इतर साहसी क्रियाकलापांमुळे कोरल रीफ्स नष्ट होत आहेत, जे अनेक सागरी जीवांसाठी निवासस्थान आहेत.
यामुळे सागरी प्रजातींची संख्या घटते, काही नवीन प्रजाती लोप पावतात आणि संपूर्ण परिसंस्था असंतुलित होते.
जबाबदार नागरिकांची भूमिका :
सागरी जीवसृष्टीचे रक्षण हे फक्त शासन किंवा पर्यावरण संस्थांचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विशेषतः मालवणसारख्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी खालील बाबींत लक्ष द्यावे.
- प्लास्टिकचा वापर टाळा आणि ‘तुमचा कचरा परत आणा’ हा नियम पाळा.
- बायोडिग्रेडेबल साहित्य वापरा, जसे की कागदी पिशव्या, स्टीलच्या बाटल्या.
- ध्वनिप्रदूषण कमी करा; समुद्रकिनाऱ्यावर जोरात संगीत न वाजवा.
- कोरल आणि सागरी जीवांना स्पर्श करू नका; स्कूबा डायव्हिंग करताना काळजी घ्या.
- स्थानिक मार्गदर्शकांचा सन्मान करा; हे केवळ मार्गदर्शक नाहीत, तर त्या भागाचे संरक्षणकर्तेही आहेत.
- पर्यावरण शिक्षण वाढवा; विद्यार्थी आणि पर्यटकांनी सागरी जीवनाबद्दल अधिक माहिती घ्यावी.
आज आपण सागर वाचवला, तर उद्या तो वाचवेल
वन्यजीव सप्ताह हा केवळ प्राणिप्रेमाचा उत्सव नाही, तर हा जागरूकतेचा आणि कृतीचा संदेश अधोरेखित करतो. मालवणसारखी जैवविविधतेने नटलेली जागा आपलीच आहे. तिचे रक्षण ही फक्त पर्यावरणप्रेमींची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यटन, रोजगार आणि निसर्ग यांचा समतोल साधत, ‘संवेदनशील पर्यटन - सुरक्षित सागरी जीवन’ ही आपली दिशा असावी. आज आपण सागर वाचवला, तर उद्या तो आपल्याला वाचवेल.