Sindhudurg: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार पावसाने दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:25 IST2025-05-15T16:25:10+5:302025-05-15T16:25:45+5:30

बाजारपेठेत चिखल : खांबाळेत नारळाच्या झाडावर पडली वीज

Heavy rains cause flooding in Vaibhavwadi, Kankavali | Sindhudurg: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार पावसाने दाणादाण

Sindhudurg: वैभववाडी, कणकवलीत मुसळधार पावसाने दाणादाण

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील बहुतांश गावांना बुधवारी (दि.१४) मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटांसह सुमारे तासभर झालेल्या पावसाने वैभववाडी बाजारपेठेत अक्षरशः दाणादाण उडवून दिली. दरम्यान, खांबाळे येथे घरानजीक असलेल्या नारळाच्या झाडांवर वीज पडली.

वैभववाडी तालुक्याच्या विविध भागांत गेल्या गुरुवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपासून काहीसे ढगाळ वातावरण होते, शिवाय प्रचंड उकाडा जाणवत होता. सकाळी अकरानंतर वाहने चालविणे मुश्कील झाले होते. दरम्यान, दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे सर्वांचीच ताराबंळ उडाली. जवळपास तासभर शहरात जोरदार पाऊस सुरू होता.

तालुक्यातील वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसूर उंबर्डे, वेंगसर, करुळ, कोकिसरे, खांबाळे, आचिर्णे, नावळे, सडुरे, कुर्ली या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. खांबाळे येथील स्नेहलता प्रभाकर पवार यांच्या घरानजीक असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यामध्ये नारळाच्या झाडाचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही.

या पावसामुळे वैभववाडी शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. आज आठवडा बाजारानिमित्त मोठी गर्दी होती. गटारांतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. रस्त्यानजीक बसलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

या भागात केवळ आठ ते दहा दिवसांचा हंगाम राहिला आहे, परंतु आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

महामार्गाच्या कामामुळे वैभववाडी चिखलात!

ऐन हंगामात वैभववाडी शहरातील संभाजी चौकातून जाणाऱ्या तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कोकिसरे नारकरवाडीपासून अर्जुन रावराणे विद्यार्थ्यांपर्यंत रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सर्वत्र चिखलच चिखल झाला असून, दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

कणकवली शहरात पावसाची हजेरी

कणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणात  उष्णतेचे प्रमाण वाढलेले असतानाच पाऊस कोसळल्याने वातावरण काहीसे थंडगार झाले होते. मात्र, काही वेळाने पुन्हा वातावरणातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली. 

शहरात पावसाने हजेरी लावताच वीज प्रवाह खंडित झाला. पाऊण तासानंतर वीज प्रवाह सुरळीत झाला. त्यामुळे उष्णतेने नागरीक त्रस्त झाले होते. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शहरातील विक्रेत्यांची धावपळ उडाली. 

Web Title: Heavy rains cause flooding in Vaibhavwadi, Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.