गुन्हे दाखल झालेल्यांना बाहेर काढणार, पालकमंत्री नितेश राणे यांचे दोडामार्गमधील कार्यकर्त्यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:51 IST2025-09-27T17:50:53+5:302025-09-27T17:51:17+5:30
'पोलिसांना त्यांचे काम करू द्या. आपण आपल्या परीने काम करू या'

गुन्हे दाखल झालेल्यांना बाहेर काढणार, पालकमंत्री नितेश राणे यांचे दोडामार्गमधील कार्यकर्त्यांना आश्वासन
दोडामार्ग : तिलारी येथे घडलेल्या घटनेला जबाबदार धरून पोलिस प्रशासनाने आमच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. आपण आपल्या परीने काम करू या, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुखरूप बाहेर काढून घरी पोहोचविण्याची जबाबदारी माझी आहे आणि हा माझा शब्द आहे, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
तिलारी येथे कारला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी भाजपा दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह अन्य दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी व युवकांचा जमाव होता. दरम्यान रात्री १०:३० वा. पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलिस ठाण्याला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर उपस्थित जमावाशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, एकनाथ नाडकर्णी, संतोष नानचे, महेश सारंग उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, पोलिसांनी आपल्या काही लोकांना ताब्यात घेतले आहे, याबाबत विनाकारण अफवा पसरवू नका. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आपल्या माणसांना लवकरात लवकर बाहेर कसे सुखरूप काढता येईल, यासाठी चांगला वकील देऊ व त्यांना बाहेर काढू. आम्ही सर्व वरिष्ठ आपल्यासोबत आहोत. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.