तोल जाऊन शेकोटीत पडल्याने होरपळून वृद्धाचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्ले-आरोसबाग येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:05 IST2025-12-24T14:05:35+5:302025-12-24T14:05:47+5:30
न्हाणीघरात पाणी गरम करताना दुर्दैवी प्रकार

तोल जाऊन शेकोटीत पडल्याने होरपळून वृद्धाचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्ले-आरोसबाग येथील घटना
बांदा : शेर्ले-आरोसबाग येथे न्हाणीघरात पाणी गरम करण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीत तोल जाऊन पडल्याने आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) पहाटे घडली. अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत बांदा पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चांदेकर हे दररोज पहाटे उठून न्हाणीघरात पाणी गरम करण्यासाठी विस्तव पेटवत असत. नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे त्यांनी लवकर उठून घराशेजारी असलेल्या न्हाणीघरात पाणी गरम करण्यासाठी चूल पेटविली. थंडीचा कडाका असल्याने ते शेकोटी घेत बसले असतानाच अचानक आग भडकली. लगतच्या माडाच्या झावळ्यांनीही पेट घेतला.
आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात ते तोल जाऊन शेकोटीत पडले. यात अविनाश चांदेकर गंभीररीत्या होरपळले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला; मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मुलगा दत्तप्रसाद चांदेकर याने बांदा पोलिसांत याची वर्दी दिली.
अविनाश चांदेकर हे बांदा येथील श्री स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या बांदा शाखेत शिपाई पदावर कार्यरत होते आणि तेथून ते दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, असा परिवार आहे.