सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, आंबेगाव-रुपणवाडीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:09 IST2025-07-16T14:07:59+5:302025-07-16T14:09:07+5:30
आर्थिक परिस्थिती बेताची, कुटुंबाचा आधार हरपला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, आंबेगाव-रुपणवाडीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेली पावसाची संततधार मंगळवारी कायम होती. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव-रुपणवाडी येथील पुलावरील पुराच्या पाण्यातून चालत जात असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एकजण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रशांत चंद्रकांत दळवी (वय ३८) असे त्याचे नाव आहे.
प्रशांत वाहून गेल्याची माहिती मिळताच आंबेगाव ग्रामस्थांसह पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्वरित शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली. पुढील दिवशी मंगळवारी सकाळी कुणकेरी येथील रवीचे भाटले येथे प्रशांत यांचा मृतदेह आढळून आला.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या परिस्थितीतच रुपणवाडी येथील पुलावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले होते. प्रशांत हा त्या पुलावरून जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी शरद लोहकरे, पोलिस कर्मचारी धोत्रे, सावंत आणि पोलिस हवालदार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
आर्थिक परिस्थिती बेताची, कुटुंबाचा आधार हरपला
प्रशांत दळवी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. प्रशांत यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ आणि भाऊजी असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. प्रशांतच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हरपल्याने आंबेगाव आणि रुपणवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.