लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 15:44 IST2025-06-11T15:42:44+5:302025-06-11T15:44:48+5:30

'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत?'

Congress to organize mashal rally in Kankavali tomorrow to protect democracy | लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

कणकवली : बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आवाज उठविला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवलीत उद्या, गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ६.३० वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.

कणकवली येथील काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूणकर, तालुका उपाध्यक्ष संजय राणे, आयेशा सय्यद, जिल्हा सचिव विजय सावंत, प्रदीपकुमार जाधव, नीलेश मालंडकर, डॉ.प्रमोद घाडीगावकर, बाबा काझी आदी उपस्थित होते.

शेख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदानामध्ये शेवटच्या टप्प्यात लाखोंनी मते वाढली आहेत. तर लोकसभा व विधानसभेच्या मतदानात मोठी तफावत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने त्याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही नेत्यांनी  याला उत्तर देताना मात्र अनेक मुद्यांना बगल दिली आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत? निवडणूक आयोगाने त्यांना प्रवक्ते नेमले आहे का? याचे उत्तर आधी भाजपने जनतेला द्यावे.

याबाबत जनजागृती होण्यासाठी कणकवली शहरातून उद्या, गुरुवारी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता बसस्थानकालगतच्या बौद्धविहार येथून या रॅलीला सुरूवात होईल. तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली निघणार आहे. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन शेख यांनी केले.

Web Title: Congress to organize mashal rally in Kankavali tomorrow to protect democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.