Sindhudurg: तरंदळे धरणात महाविद्यालयीन युवक, युवतीची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून पाऊल उचलल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:58 IST2025-12-11T17:57:43+5:302025-12-11T17:58:47+5:30
नेमके कारण अस्पष्टच

Sindhudurg: तरंदळे धरणात महाविद्यालयीन युवक, युवतीची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून पाऊल उचलल्याचा संशय
कणकवली : कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील धरणात मंगळवारी रात्री सोहम कृष्णा चिंदरकर (वय २२, रा. कलमठ, कुंभारवाडी) व ईश्वरी दीपक राणे (वय १८, रा. कणकवली, बांधकरवाडी) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या आत्महत्येचा नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नव्हते.
सोहम चिंदरकर कणकवली महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता, तर ईश्वरी कनेडी महाविद्यालयात बारावीमध्ये अभ्यास करत होती. दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता सोहम महाविद्यालयाला गेला आणि दुपारी एक वाजता परत आला. महाविद्यालयातून आल्यानंतर त्याने आईला आपला मोबाइल हरवल्याचे सांगितले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोबाइल शोधण्यासाठी त्याने काका मिलिंद चिंदरकर यांची दुचाकी वापरून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही.
त्याच्या त्या उशिरा घरी न येण्यामुळे त्याची आई यांनी मिलिंद यांना विचारले, ‘सोहमला कोठे पाठवले आहे का?’ मिलिंद यांनी उत्तर दिले की, ‘त्याला कुठेही पाठवलेले नाही, आपला हरवलेला मोबाइल शोधण्यासाठी तो दुचाकी घेऊन गेला आहे.’ त्यावेळी आईने सांगितले की, सोहमने मोबाइल हरवल्यामुळे आपण आपला मोबाइल घेतला होता आणि तो परत दिला. त्यामुळे सोहमच्या मोबाइलवरून त्याने कोणाशी संपर्क साधला किंवा व्हॉट्सॲपवर कोणाशी चॅटिंग केली का, हे घरच्यांनी तपासले.
मंगळवारी मध्यरात्री १:२० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आणि पहाटेच दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला गेला. मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी दोघांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. सोहमचे काका मिलिंद चिंदरकर यांनी पोलिस ठाण्यात ही माहिती दिली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मेसेज करून दोघे गेली धरणावर
तपासात समजले की सोहमने ‘sista’ नावाने एक नंबर सेव्ह करून त्याच्यावर ईश्वरीशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चॅटिंग बराच काळ चालू होती आणि त्यात दोघांनी अनेक मेसेजेसची देवाणघेवाण केली होती. त्यामध्ये सोहमने मोबाइल हरवल्याची भीती व्यक्त केली, तसेच आपल्या भावना व्यक्त करत ‘आपण डॅमवर जाऊ’, असेही सांगितले होते. दरम्यान, सोहम घरी निघाल्यानंतर त्याची मैत्रीण ईश्वरी सुद्धा घरात नव्हती, अशी माहिती नंतर मिळाली.
तरंदळे धरणात आढळले मृतदेह
त्याच्या या चॅटिंगमुळे त्याच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी रात्री सुमारे एक वाजता तरंदळे धरण गाठले. पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. धरणाच्या सांडव्याजवळ टॉर्चने शोध घेतल्यावर सोहम आणि एका मुलीचा पाण्यात बुडालेला मृतदेह आढळला. नंतर ईश्वरीच्या नातेवाइकांना कळवले गेले आणि त्यांनी घटनास्थळी येऊन ती मुलगी ईश्वरी असल्याचे सांगितले.
एकाचवेळी दोघांची आत्महत्या
सोहमचा मृतदेह उताण्याच्या स्थितीत तर ईश्वरीचा मृतदेह उपडी अवस्थेत तरंगताना आढळला. दोघांच्या पायात चप्पल होत्या, तर धरणाजवळ दुचाकी आणि एक दोरी सापडली. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या शोध मोहिमेत कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, ग्रामस्थ, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर, हवालदार सुदेश तांबे, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यात मोठी खळबळ
सोहमच्या पश्चात आई, काका व कुटुंबीय आहेत, तर ईश्वरीच्या मागे आई, वडील, दोन बहिणी आणि आजी आहेत. यामुळे दोन्ही कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.