मुलांना बालपणापासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे : गोविंद भारद्वाजम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:56 IST2025-09-29T13:55:31+5:302025-09-29T13:56:41+5:30
डेहराडून येथे संपन्न झाला नागरिक विज्ञाना प्रशिक्षण कार्यक्रम, देशभरातील प्रशिक्षणार्थींनी घेतला सहभाग..

मुलांना बालपणापासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे : गोविंद भारद्वाजम
संदीप बोडवे
डेहराडून: हवामान बदलाचे आव्हान मोठे होत आहे आणि त्याचे प्रतिकूल परिणाम समस्या वाढवत आहेत. भविष्यात पर्यावरण वाचवायचे असेल तर मुलांना बालपणा पासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे. नागरिक विज्ञानाशिवाय पर्यावरणाचे रक्षण अशक्य आहे असल्याचे मत भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक गोविंद सागर भारद्वाज यांनी व्यक्त केले.
केंद्रीय अकॅडमी राज्य वन सेवा, डेहराडून तर्फे आयोजित 'जंगले आणि वन्यजीव संवर्धनात नागरिक विज्ञानाच्या भूमिके' वरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रादरम्यान (दि. २४ बुधवार) ते बोलत होते.
सेंट्रल अकादमी ऑफ स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसचे प्राचार्य ई. विक्रम म्हणाले, की, या उपक्रमामुळे केवळ पर्यावरण संरक्षण मजबूत होणार नाही तर मुलांना जबाबदार नागरिक बनण्यास देखील मदत होईल. जर आपल्याला पर्यावरण वाचवायचे असेल तर लहानपणापासूनच मुलांना निसर्ग, वनस्पती आणि पक्ष्यांशी जोडले पाहिजे. त्यांचे महत्त्व स्पष्ट केले पाहिजे. मोबाईल फोन सारख्या मनोरंजनाच्या तंत्रामुळे मुले हळूहळू निसर्गापासून दूर होऊ लागली आहेत. खरेतर निसर्गाकडून बरेच शिकण्यासारखे असते. शाळेच्या चार भिंती ओलांडून मुलांना निसर्गात नेवून शिकविले पाहिजे.
सत्रादरम्यान अभ्यासक्रम संचालक अंकित गुप्ता आणि इतर उपस्थित होते. तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रात देशभरातील ३० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र मधून या सत्रात पत्रकार संदीप बोडवे, युथ बिट्स चे ऐश्वर्य मांजरेकर हे सहभागी झाले होते.
या सत्रात डॉ गोविंद सागर भारद्वाज (IFS), संचालक, भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय), डेहराडून, ई. विक्रम (IFS), प्राचार्य, सीएएसएफओएस, डेहराडून, अंकित गुप्ता, वैज्ञानिक-सी आणि सीडी, कॅसफोस, डेहराडून, डॉ स्वप्नाली गोळे, प्रकल्प शास्त्रज्ञ, डब्ल्यूआयआय, डेहराडून, रिद्धिमा करवा, वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक, अर्थियन डेहराडून, कुहेलिका बिश्त, सहयोगी संघटक, सीएसए, डेहराडून, डॉ. सौम्या प्रसाद, संस्थापक, नेचर सायन्स इनिशिएटिव्ह, डेहराडून, राम दयाल वैष्णव, प्रमुख (सीएस अँड ई), द नॅचरलिस्ट स्कूल, बेंगळुरू, तन्नू सैनी, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया, दिल्ली (एनडी), अभ्यासक सिपू कुमार यांनी मार्गदर्शन केले.