सावंतवाडीतील व्यावसायिकाने गळफास घेऊन जीवन संपविले, घरातून रक्त बाहेर आल्याने उघडकीस आली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:14 IST2025-06-19T16:13:19+5:302025-06-19T16:14:03+5:30
घरात एकटेच राहत होते

सावंतवाडीतील व्यावसायिकाने गळफास घेऊन जीवन संपविले, घरातून रक्त बाहेर आल्याने उघडकीस आली घटना
सावंतवाडी : सावंतवाडी सालईवाडा येथील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद सुभाष पडते (४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. त्यांच्या घरातून रक्त बाहेर येताना दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पडते यांचे घर गेल्या दोन दिवसांपासून बंद होते. बुधवारी दुपारी घराच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येताना शेजाऱ्यांना दिसले, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील रहिवासी दत्ताराम पडते यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी प्रसाद पडते यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
दत्ताराम पडते यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असावी, कारण मृतदेहातून रक्त बाहेर येऊन ते दरवाजाबाहेर आले होते. पडते हे घरात एकटेच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते.
प्रसाद पडते यांचे सावंतवाडी बाजारपेठेत ‘प्रसाद कोल्ड्रिंक्स’ नावाचे दुकान आहे आणि ते गेली अनेक वर्षे हा व्यवसाय करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते दिसून न आल्याने त्यांच्या घराजवळ चौकशी केली असता, दरवाजा बंद आढळला आणि त्यानंतर रक्ताचा वास आल्याने हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी तो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, हवालदार महेश जाधव, अनिल धुरी, निलेश नाईक आणि सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. या घटनेने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.