'भोसले सैनिक स्कूल'मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शौर्य परंपरेला नवा आयाम, मंत्री नितेश राणेंचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:18 IST2025-11-15T17:17:53+5:302025-11-15T17:18:35+5:30
कोकणात होत असलेल्या पहिल्या सैनिक स्कूलचे भूमिपूजन

'भोसले सैनिक स्कूल'मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शौर्य परंपरेला नवा आयाम, मंत्री नितेश राणेंचे गौरवोद्गार
सावंतवाडी : निसर्ग संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याला शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. ‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम प्राप्त होणार आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिले सैनिक स्कूल ‘भोसले सैनिक स्कूल‘ चे भूमिपूजन मंत्री राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार दीपक केसरकर, मनीष दळवी, अच्युत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता भोंसले, सचिव संजीव देसाई, रत्नेश सिन्हा, श्रीकांत वालवडकर, निरज चौधरकर, विनय देगांवकर उपस्थित होते.
राणे म्हणाले, अलिकडेच मालवण किनारपट्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘नौदल दिन’ साजरा करण्यात आला. तो सोहळा जिल्ह्यासाठी एक भूषण ठरला होता. त्यामुळे जिल्ह्याचं सैनिकांप्रती असलेलं योगदान लक्षात घेता असं स्कूल आपल्या जिल्ह्यात उभी राहत आहे हे देखील भूषणावह आहे. सैनिक स्कूल होणे ही येथील मुलांसाठी सुवर्णसंधी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. तर यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे पालकमंत्री या नात्याने अभिनंदन करतो. कारण संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मेहनत व कष्ट घ्यावे लागतात असे गौरवोद्गार राणे यांनी काढले.
केसरकर यांनी आपण अच्युत भोसले याच्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यांनी पॉलिटेक्नीक उभारले त्यानंतर आपला प्रवास सुरू केला तो वाखण्यजोगे असाच होता असे म्हणाले. मी शिक्षण मंत्री होतो त्यामुळे मला या मागे किती कष्ट घ्यावे लागतात हे माहित आहे. भोसले यांचा प्रवास मोठा आहे असे ही केसरकर म्हणाले.
यावेळी अच्युत भोसले यांनी छोट्या फिल्म रूपी सैनिक उभारण्यात येणार असल्याचे सर्व गोष्टीचा उलगडा केला तसेच यात सर्वानी हातभार लावला त्याचे आभार मानले. तर राकेश सिन्हा यांनी ही सैनिक स्कूल च्या भविष्यातील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचा गौरव करण्यात आला.