खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न; जयपुरातील शिवराज गँगमधील तिघांना शिरोड्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:32 IST2025-01-31T17:32:00+5:302025-01-31T17:32:33+5:30
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न; जयपुरातील शिवराज गँगमधील तिघांना शिरोड्यात अटक
ओरोस : खंडणीसाठी पिस्तूलने गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. असाच एक गुन्हा जयपूर (राजस्थान) येथे करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे लपून बसलेले शिवराज गँगचे आरोपी करण पारिक, दीपक जाट ऊर्फ लांबा, नरेंद्रसिंह चौहान या तिघांना सिंधुदुर्गपोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
२४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुदतीत (रमणपुरी, जि. जयपूर, राजस्थान) येथे शिवराज गॅंग, राजस्थानचा आरोपी हन्नी बिहारी आणि त्याच्या तीन साथीदारांनी खंडणीसाठी कारमधून येत तक्रारदार व साक्षीदार यांचा पिस्तूलने गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न करून पळून गेले. त्यापैकी आरोपी करण मातादिन पारीक (२२, रा. मोरीजा, ता. चौमू), दीपक सोमवीर जाट ऊर्फ लांबा (२०, रा. सरदारपुरा, ता. अमेर),
नरेंद्रसिंग गजेंद्र चौहान (१९, रा. बेनार रोड, खोराबीसल, सर्व जयपूर, राजस्थान) हे गुन्हा केल्यानंतर अस्तित्व लपवण्यासाठी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून शिरोडा येथे वास्तव्यास आले होते. या आरोपींविरुद्ध करधनी पोलिस ठाणे, जयपूर (पश्चिम), राजस्थान येथे भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९ (१), १८९ (४), ३०८ (२), भारतीय हत्यार अधिनियम १९५९ (संशोधन २०१९) चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
राजस्थानी बेकरीजवळ वास्तव्य
सिंधुदुर्ग पोलिसांना हे आरोपी शिरोडा (सिंधुदुर्ग) व गोवा राज्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला ही माहिती देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्याचदरम्यान हे आरोपी शिरोडा एस. टी. बस स्टॅंडजवळील एका राजस्थानी बेकरी व्यावसायिकाच्या बेकरीजवळ राहात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून तिन्ही आरोपींना शिरोडा येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपी राजस्थान पोलिसांच्या ताब्यात
आरोपी करन मातादिन पारीक याच्याविरुद्ध जयपूर जिल्ह्यात दोन गंभीर गुन्हे दाखल असून, त्यामध्ये लहान मुलीवर अत्याचार, अमली पदार्थ विक्री अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. हा आरोपी यापूर्वी दोनवेळा सुमारे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी कारागृहात राहिलेला आहे. नागरिकांना धमकावून किंवा त्यांच्यावर हल्ला करून खंडणी गोळा करण्याच्या उद्देशाकरिता या टोळीकडून गुन्हे केले जात आहेत. या आरोपींना गुरुवारी करधनी पोलिस ठाणे, राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
वैयक्तिक कागदपत्रांची पडताळणी करावी
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, परप्रांतीय व्यक्ती तसेच अनोळखी भाडेकरू यांना वास्तव्यासाठी ठेवताना किंवा रूम भाड्याने देताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांची पडताळणी करून तशी नोंदणी करून घ्यावी.