सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘गणपती पावला’, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:00 IST2025-08-30T17:59:08+5:302025-08-30T18:00:19+5:30
गेल्या काही काळापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या लाभासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता

संग्रहित छाया
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदआरोग्य विभागातील तब्बल ४३४ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ३१४ कार्यरत, तर १२० सेवानिवृत्त कर्मचारी समावेश आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. या निर्णयाचा फायदा जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार असून, सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्यापासूनचा फरकदेखील त्यांना मिळणार आहे. आरोग्य पर्यवेक्षक (कार्यरत १६, सेवानिवृत्त १३, एकूण २९), आरोग्य सहायक (पुरुष) कार्यरत ५५, सेवानिवृत्त १४, एकूण ६९, आरोग्यसेवक (पुरुष) कार्यरत १३१, सेवानिवृत्त १०, एकूण – १४१, आरोग्यसेवक (महिला) : कार्यरत ११२, सेवानिवृत्त ८३, एकूण १५५ एकूण लाभार्थी : ४३४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या काही काळापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या लाभासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने सुधारित आदेश जाहीर करत कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे. वेतनश्रेणीतील फरक मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार असून, सणासुदीच्या खरेदीला गती मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांतून स्वागत करण्यात येत आहे.