Sindhudurg: एकाकी राहणाऱ्या वृद्धेचा होरपळून मृत्यू, कणकवली येथील घटना; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:01 IST2025-07-30T14:00:23+5:302025-07-30T14:01:00+5:30

फ्लॅटमध्ये अचानक आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

An elderly woman died in a fire in her living room in Kankavli | Sindhudurg: एकाकी राहणाऱ्या वृद्धेचा होरपळून मृत्यू, कणकवली येथील घटना; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

Sindhudurg: एकाकी राहणाऱ्या वृद्धेचा होरपळून मृत्यू, कणकवली येथील घटना; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

कणकवली : एका वृद्ध महिलेचा आपल्या राहत्या खोलीतच जळून अत्यंत हृदयद्रावक अंत झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. कणकवली कांबळे गल्ली येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत वृद्ध महिलेचे नाव रत्नप्रभा शंकर पंडित (८५, मूळ निवासी हळवल, ब्राह्मणवाडी) असे आहे.

कणकवली येथील कांबळे गल्लीतील कामत कॉर्नर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आपल्या भाचीच्या फ्लॅटमध्ये रत्नप्रभा पंडित गेली वीस वर्षे एकटीच राहत होती. तिचा भाचा संतोष दिनकर सुखटणकर (रा. कणकवली, जळकेवाडी) हा एमआर आहे. त्याने त्या फ्लॅटमधील हॉलच्या रूममध्ये व्यवसायासाठी आवश्यक औषधांचे बॉक्स एका बाजूला रचून ठेवले होते, त्यामुळे त्याचे अधूनमधून येणे-जाणे त्या ठिकाणी होत असे.

त्या फ्लॅटच्या हॉलमध्ये रत्नप्रभा पंडित एका बाजूला लोखंडी कॉटवर झोपत असे. ती वयस्कर असल्यामुळे घरी जेवण बनवत नव्हती. तिला जेवणाचा डबा एक महिला देत असे. याशिवाय ती स्वतःच चहा व नास्ता करायची. तसेच स्वप्न पडत असल्यामुळे रात्री झोपताना आपल्याजवळच अगरबत्ती लावण्याची सवय तिला होती.

सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रत्नप्रभा हिला जेवणाचा डबा देणारी महिला त्या फ्लॅटकडे गेली; पण हाक मारून तसेच दरवाजा ठोठावूनही रत्नप्रभा हिने तो उघडला नाही. त्यामुळे त्या महिलेने संतोष सुखटणकर याला फोन करून हा विषय सांगितला. संतोष त्वरित त्या ठिकाणी गेला. प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नसल्याने कटावणीच्या साहाय्याने आतील कडी काढून दरवाजा उघडला.

आत पाहिले असता रत्नप्रभा होरपळलेल्या अवस्थेत कॉटच्या खाली बेशुद्ध पडलेली दिसली तसेच लोखंडी कॉटवरील गादीसह सर्व अंथरूण जळून खाक झालेले होते. तिच्या मदतीसाठी तिला रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे नेले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

रत्नप्रभा पंडित यांचा विवाह झालेला नव्हता. फ्लॅटमध्ये अचानक आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यात संतोष सुखटणकर यांनी माहिती दिली असून, या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार विनोद सुपल करत आहेत.

Web Title: An elderly woman died in a fire in her living room in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.