Sindhudurg: अपघात पाहण्यासाठी थांबले, डंपरने चिरडले; तरुण-तरुणी ठार, हुमरमळा येथील अपघातात ११ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 18:20 IST2025-05-14T18:20:11+5:302025-05-14T18:20:29+5:30

ओरोस : मुंबई - गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे टाटा मोटर्स शोरूमसमोर दुचाकी आणि इनोव्हा कार यांच्यात झालेला अपघात पाहण्यासाठी ...

A young man and woman who stopped to watch an accident between a bike and a car at Humarmala on the Mumbai Goa highway were killed | Sindhudurg: अपघात पाहण्यासाठी थांबले, डंपरने चिरडले; तरुण-तरुणी ठार, हुमरमळा येथील अपघातात ११ जण जखमी

Sindhudurg: अपघात पाहण्यासाठी थांबले, डंपरने चिरडले; तरुण-तरुणी ठार, हुमरमळा येथील अपघातात ११ जण जखमी

ओरोस : मुंबई - गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे टाटा मोटर्स शोरूमसमोर दुचाकी आणि इनोव्हा कार यांच्यात झालेला अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या युवक-युवतीवर काळाने घाला घातला आहे. अनुष्का अनिल माळवे (१८, रा. अणाव दाबाचीवाडी), विनायक मोहन निळेकर (२२, रा. रानबांबुळी) यांना डंपरने चिरडले असून, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

तसेच इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि कारमधील नऊजण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात इनोव्हा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना व विचित्र भीषण अपघातात युवक-युवतींचा झालेला करुण अंत यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

दोन दुचाकी, डंपर व इनोव्हा कार या चार वाहनांमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात युवक-युवती ठार झाली. रोहित कुडाळकर (३०, रा. ओरोस बोरभाटवाडी) हे कामावर दुचाकीने (क्र. एमएच ०७ एम ०२९४) जात असताना मागून आलेल्या इनोव्हा कारने (क्र. एमएच ०६ एबी ८२१९) मागून धडक दिली. त्यामुळे इनोव्हा कारचा ताबा सुटला व ही कार रस्त्याच्या खाली कोसळली. त्यामुळे या कारचा चालक गंभीर जखमी झाला व त्यातील प्रवाशीही जखमी झाले. दुचाकीस्वार रोहित कुडाळकर रस्त्यावर फेकला गेल्याने तोही जखमी झाला.

हा अपघात घडला असताना त्या मागून आलेल्या दुसरा दुचाकीस्वार विनायक निळेकर व पाठीमागे बसलेली अनुष्का माळवे यांनी हा अपघात पाहण्यासाठी आपली दुचाकी (क्र. एमएच ०७ इ ७८९६) थांबविली. त्याचवेळी त्यांचा तोल गेला व ही दोघे महामार्गावर कोसळली. त्यांच्या मागोमाग असलेल्या डंपरच्या (क्र. एमएच ०६ डीबी ०९८७) मागच्या चाकाखाली युवक-युवती सापडले व या दोघांना चिरडून डंपर निघून गेला. डंपरचालकाच्या ही घटना लक्षात आली नाही. मात्र पोलिसांनी या डंपरचा शोध घेत त्याला सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात आणला.

दरम्यान, या अपघातानंतर रानबांबुळी, दाबाचीवाडी, ओरोस परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे गाठले. डंपरचालकाला आणि मालकाला समोर आणा अन्यथा आम्ही दोन्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका धरली. यावेळी बराच काळ पोलिस ठाण्यातील वातावरण तंग झाले होते. त्यानंतर त्या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत आदींसह काहीजण उपस्थित झाले. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक सावंतवाडी विनोद कांबळे उपस्थित झाले. बऱ्याच वेळानंतर हे प्रकरण थोडे शांत झाले आणि नातेवाइकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले.

दरम्यान, हयगयीने वाहन चालून दुचाकीस्वार आणि गाडीतील व्यक्तींच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक विशाल चव्हाण आणि मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डंपरचालक सुनील विष्णू कोळकर (५२, रा. वाडीवरवडे) याच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ जण जखमी

या अपघातात दुचाकीस्वार रोहित कुडाळकर (रा. ओरोस बोरभाटवाडी), कारमधील सदानंद शंकर लोंढे (६२, रा. कांदिवली), प्रेक्षा नाईक (८, रा. कल्याण), भारती नाईक (४९, रा. कल्याण), मनोज दळवी (५२, रा. भाईंदर), वैष्णवी दळवी (५०, रा. भाईंदर), सुनीता दळवी (५८, रा. बांद्रा), कौस्तुभ गोडे (२६), सुष्मा गोडे (५४), शैला दळवी (५०, सर्व रा.भाईंदर) आणि कारचालक विशाल चव्हाण (३२, रा. प्रभादेवी) असे एकूण ११ जण जखमी झाले आहेत.

अपघात पाहण्यास थांबले अन्..

मुंबई - गोवा महामार्गावर हुमरमाळा येथे टाटा मोटर्स शोरूमसमोर दुचाकी आणि इनोव्हा कार यांच्यात झालेला अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या युवक- युवतीवर काळाने घाला घातला आहे. अनुष्का अनिल माळवे (१८) आणि विनायक मोहन निळेकर (२२) यांना डंपरने चिरडले असून, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: A young man and woman who stopped to watch an accident between a bike and a car at Humarmala on the Mumbai Goa highway were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.