खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:42 IST2025-03-17T12:42:24+5:302025-03-17T12:42:58+5:30

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील ...

A plot to give away mineral reserves to favored industrialists Congress state president Harshvardhan Sapkal accuses the ruling party | खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील खनिज साठ्यांच्या उत्खननाला ग्रामस्थांचा विरोध होऊ नये याकरिता सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम भाजपचे मंत्री व नेतेमंडळींकडून सुरू आहे. हा कुटील डाव सिंधुदुर्गवासीयांनी हाणून पाडण्यासाठी लढा दिला पाहिजे. या लढ्यात काँग्रेस पक्ष जिल्हावासीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. 

वागदे येथील गोपुरी आश्रामाला सपकाळ यांनी भेट दिली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंत व सामाजिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल डेगवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, डॉ. मंगेश सावंत आदी उपस्थित होते.     

सपकाळ म्हणाले, तोडा-फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. याविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे.  राणे-पित्रापुत्र सत्तेत असल्याने त्यांनी जिल्ह्यात पुन्हा राजकीय दहशतवाद माजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू लागला आहे. तो बिघडू नये म्हणून परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी या दहशतवादविरोधात लढाई सुरु केली पाहिजे. या लढाईत काँग्रेस पक्ष आपल्या खांद्याला खांदा लावून लढेल.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होताना दिसत आहे. पक्ष संघटनेचे नेटवर्क मजबूत होण्यासाठी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कृती कार्यक्रम दिले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने वाटचाल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष गाव ते राष्ट्रीय पातळीवर पुन्हा गतवैभव प्राप्त करेल. सिंधुदुर्गातील विचारवंत, परिवर्तन चळवळीतील मंडळी, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या जनहितार्थ असलेल्या उपक्रमांमध्ये आणि भाजपविरोधी लढ्यात पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. 

या संवादा दरम्यान भाजपचे मंत्री व नेते हे एका धर्माला टार्गेट करीत आहेत. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, असे ऍड. संदीप निंबाळकर म्हणाले. काँग्रेस पक्षाने परिवर्तनवादी, समाजवादी चळवळींशी व सामाजिक संस्थांशी कनेक्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी सपकाळ यांचे गोपुरी आश्रमाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशामुक्ती मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, साहित्यिका सरिता पवार, दादा कुडतरकर आदी उपस्थित होते.

सदभावना पदयात्रा काढणार 

बिघडलेला सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष लवकरच जिल्ह्यात सदभावना पदयात्रा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: A plot to give away mineral reserves to favored industrialists Congress state president Harshvardhan Sapkal accuses the ruling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.