Sindhudurg Crime: कुरिअरचे वाहन लुटण्याचा प्रयत्न, कारच्या अपघाताने सहाजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:39 IST2025-12-31T15:39:02+5:302025-12-31T15:39:15+5:30
दराेड्याचा गुन्हा दाखल : महामार्गावर पणदूर येथील घटना, गाडीचा पाठलाग, दगडफेकीचाही प्रकार

Sindhudurg Crime: कुरिअरचे वाहन लुटण्याचा प्रयत्न, कारच्या अपघाताने सहाजण ताब्यात
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : कुरिअरचे वाहन लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील स्थानिक ६ तरुणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पणदूर परिसरात घडली होती. या प्रकरणात थरारक पाठलाग आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली तसेच आरोपी पळून जाताना कारला अपघात झाला.
याप्रकरणी कंटेनर चालक मनोजकुमार पाल, एस. ओपन बेचैनलाल (वय ३१, रा. मिर्जापूर, उत्तर प्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुजल सचिन पवार (झाराप), राहुल अमित शिरसाट (कुडाळ), प्रशांत नितीन सावंत, प्रज्वल नितीन सावंत (दोघे रा. वेताळ बांबर्डे), मंदार सोनू उमरकर (कुडाळ) आणि राहुल सदानंद नलावडे (पावशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व संशयित स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले कंटेनर चालक पाल यांचा कंटेनर पणदूर परिसरातून जात असताना एका बलेनो कारमधून आलेल्या तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. लुटीच्या उद्देशाने त्यांनी कंटेनर अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने प्रसंगावधान राखत गाडी न थांबवता वेगाने पुढे नेली. यामुळे संतापलेल्या आरोपींनी चालत्या कंटेनरवर दगडफेक केली.
संशयितांचा पळून जाताना कारला अपघात
कंटेनरचा पाठलाग करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपींच्या कारचा कुडाळ शहरात अपघात झाला. कुडाळ येथील गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने कार एका दुकानावर आणि जिल्हा बँकेच्या एटीएमवर जाऊन धडकली. या धडकेत दुकानाचे व एटीएमचे मोठे नुकसान झाले असून, रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका वॅगनार कारलाही या कारने जोरदार धडक दिली.
त्यानंतर या कारमधील सहा जण पोलिसांच्या तावडीत सापडले. या संपूर्ण घटनेमुळे कुडाळ परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.