Sindhudurg: देवगड-जामसंडे ५ जणींना १२ लाखांना गंडा, महिला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:26 IST2025-06-18T15:26:34+5:302025-06-18T15:26:51+5:30

देवगड : दर महिना उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून देवगड-जामसंडे शहरातील पाच महिलांची १२ लाख ७२ हजार ...

5 women robbed of 12 lakhs in Devgad Jamsande, women arrested | Sindhudurg: देवगड-जामसंडे ५ जणींना १२ लाखांना गंडा, महिला ताब्यात

Sindhudurg: देवगड-जामसंडे ५ जणींना १२ लाखांना गंडा, महिला ताब्यात

देवगड : दर महिना उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून देवगड-जामसंडे शहरातील पाच महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देवगड पवनचक्की येथील श्रद्धा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (३६) या संशयित महिलेविरुद्ध देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित श्रद्धा मोंडकर हिने २२ सप्टेंबर २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत देवगड जामसंडे शहरातील पाच महिलांची सुमारे १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात प्रशांत राऊत यांनी तक्रार दिली. 

या तक्रारीमध्ये मोंडकर हिने २२ सप्टेंबर २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजी या कालावधीत देवगड जामसंडेमधील एकूण पाच महिलांकडून उत्तम परतावा देणारी स्कीम असल्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटकरिता रक्कम घेतली. ही रक्कम एकूण १२ लाख ७२ हजार ४०० रुपये असून पाचही महिलांनी तिच्याकडे एजंट म्हणून सोपविलेल्या रकमेची मागणी केली. मात्र त्यांना वेगवेगळ्या सबबी सांगून दिलेली रक्कम देण्याचे टाळले. तसेच मूळ मुद्दल व व्याजही परत न करता आर्थिक फसवणूक केली, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी श्रद्धा प्रकाश मोंडकर हिच्याविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४०६, ४२० व महाठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संशयित महिलेला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.

Web Title: 5 women robbed of 12 lakhs in Devgad Jamsande, women arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.