Sidhudurg ZP Election 2026: सिंधुदुर्गात भाजपचा बिनविरोध पॅर्टन सुसाट, किती जणांनी मारली बाजी.. जाणून घ्या
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 27, 2026 19:41 IST2026-01-27T19:40:44+5:302026-01-27T19:41:17+5:30
विरोधकांना जोरदार धक्का

Sidhudurg ZP Election 2026: सिंधुदुर्गात भाजपचा बिनविरोध पॅर्टन सुसाट, किती जणांनी मारली बाजी.. जाणून घ्या
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ५० पैकी ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १०० जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
भाजपाचे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेल्या २५ सदस्यांमध्ये भाजपाचे ७ जिल्हा परिषद सदस्य आणि १६ पंचायत समिती सदस्यांसह २३ जण बिनविरोध निवडून आले आहेत. तर शिंदेसेनेचा एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध झाला आहे. जिल्ह्यात भाजपासह महायुतीचा बिनविरोध पॅटर्न सुसाट असल्याचे पहायला मिळाले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक ५ फेब्रुवारीला होत आहे. यानिमित्ताने उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारीच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या जिल्ह्यातील अनेक बंडखोरांना थंड करण्यातही पक्ष नेतृत्वाला यश आले आहे.
जिल्हा परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य
१. खारेपाटण : प्राची ईस्वलकर (भाजप), २. बांदा : प्रमोद कामत (भाजपा), ३.जानवली : रूहिता राजेश तांबे (शिंदेसेना), ४. पडेल : सुयोगी रवींद्र घाडी (भाजप), ५. बापर्डे : अवनी अमोल तेली (भाजप), ६. पोंभुर्ले : अनुराधा महेश नारकर (भाजप), ७. किंजवडे : सावी गंगाराम लोके (भाजप), ८. कोळपे : प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप).
पंचायत समितीचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य
१. पडेल : अंकुश यशवंत ठुकरूल (भाजप), २. नाडण : गणेश सदाशिव राणे (भाजप), ३. बापर्डे : संजना संजय लाड (भाजप), ४. फणसगाव : समृद्धी संतोष चव्हाण (भाजप), ५. शिरगाव : शितल सुरेश तावडे (भाजप). ६. कोटकामते : ऋुतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप), ७. कोकिसरे : साधना सुधीर नकाशे (भाजप), ८. आसोली : संकेत धुरी (भाजप). ९. आडवली मालडी : सीमा सतीश परूळेकर (भाजप). १०. शेर्ले : महेश धुरी (भाजप). ११. कोलझर : गणेशप्रसाद गवस (शिंदेसेना). १२. वरवडे : साेनू सावंत (भाजप), १३. नांदगाव : हर्षदा वाळके (भाजप). १४. जानवली : महेश्वरी महेश चव्हाण (भाजप). १५. बिडवाडी : संजना संतोष राणे (भाजप), १६. हरकुळ बुद्रुक : दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप), १७. नाटळ : सायली संजय कृपाळ (भाजप).
हुकूमशाहीकडे वाटचाल
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून राबविला जाणारा ‘बिनविरोध’ निवडणुकीचा पॅटर्न लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. विविध आमिषे दाखवून किंवा दबावतंत्राचा वापर करून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. सर्वसामान्य नागरिक भविष्यात मतदानापासून दूर जाण्याची भीती आहे. - अनिल केसरकर, मनसे जिल्हाध्यक्ष.
पराभवाला घाबरून अनेकांची माघार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार राबवित असलेल्या विकास अजेंड्यामुळे सूज्ञ मतदार महायुतीच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकेल. उद्धवसेनेने बळजबरीने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांना आपला पराभव समोर दिसत असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. - प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष भाजप