वाळूत लपवून ठेवलेली व्हेल माशाची १९ किलोची उलटी जप्त, मालवण पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:58 IST2023-02-11T13:57:33+5:302023-02-11T13:58:08+5:30
तस्करीचे किनारपट्टीवरील कनेक्शन अद्यापही समोर आलेले नाही

वाळूत लपवून ठेवलेली व्हेल माशाची १९ किलोची उलटी जप्त, मालवण पोलिसांची कारवाई
मालवण : तालुक्यातील तळाशील येथे वाळूत लपवून ठेवलेले तब्बल १८.६०० किलोंचे अम्बरग्रीस अर्थात व्हेलची उलटी मालवण पोलिसांनी जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेलच्या उलटीला मोठी किंमत असल्यामुळे तिची तस्करीसुद्धा केली जाते. अशा तस्करीत सिंधुदुर्गातील एकाला सांगलीत अटक करण्यात आली आहे.
तळाशील येथील नीलेश रेवणकर यांच्याकडे अंबरग्रीससदृश कोणता तरी पदार्थ असल्याची माहिती सागररक्षक संजय तारी यांनी पोलिसांना दिली होती. यावरून मालवणचे पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एच. व्ही. पेडणेकर व सुशांत पवार यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कार्यवाही केली आहे. पोलिसांच्या पथकाने नीलेश रेवणकर यांच्याकडे संबंधित पदार्थाबाबत चौकशी केली असता तो पदार्थ वाळूत लपविलेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तो पदार्थ वाळूतून बाहेर काढत त्याचा पंचनामा केला. यावेळी वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याबाबत वनविभागाची संपर्क साधला असता, तळाशील येथे सापडलेला तो पदार्थ व्हेल माशाची उलटीच आहे का, हे तपासण्यासाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. सापडलेले तुकडे व्हेल मासा उलटी आहे की नाहीत, याचीही याद्वारे तपासणी होणार आहे.
अनेक प्रकरणे समोर
बुधवारी सांगली येथे पावणेसहा कोटी रुपये किमतीची व्हेलची उलटी पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत सिंधुदुर्गातील एकाला अटक करण्यात आली आहे. बऱ्याचदा व्हेलच्या उलटीची तस्करी करणारे सांगली, पुणे, नाशिक या भागांत सापडून आल्याची मागील दोन वर्षांत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र या तस्करीचे किनारपट्टीवरील कनेक्शन अद्यापही समोर आलेले नाही. याबाबत किनारपट्टीवरील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.