Satara Crime: प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकाचा खून, सात संशयितांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:20 IST2025-05-07T16:18:52+5:302025-05-07T16:20:57+5:30

मृतासह आरोपीही कासेगावचे; बेदम मारहाणीत मृत्यू

Youth murdered on suspicion of love affair in vathar Satara district, seven suspects arrested | Satara Crime: प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकाचा खून, सात संशयितांना अटक 

Satara Crime: प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकाचा खून, सात संशयितांना अटक 

कऱ्हाड : प्रेमसंबंधाच्या संशयावरून सात जणांनी अपहरण करीत बेदम मारहाण करून युवकाचा खून केला. वाठार, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

रहिमतुल्ला सलीम आतार (वय २७, रा. कासेगाव) असे खून झालेल्या युवकाचे आहे. सुदाम मोहन पवार (वय २७), राकेश रामदास पाटील (वय २६), अमर सुरेश खोत (वय २७), विराज युवराज तोडकर (वय २६), उमेश रवींद्र पाटील (वय २८), विशाल हणमंत शिंदे (वय २३) व ऋषिकेश धनाजी तोडकर (वय २६, सर्व रा. कासेगाव, ता. वाळवा) अशी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेगाव येथील रहिमतुल्ला आतार हा मोबाइल दुरुस्तीचा व्यवसाय करीत असल्याने त्याचे कऱ्हाडला नेहमी येणे-जाणे होते. सोमवारी दुपारीही तो कऱ्हाडला येण्यासाठी निघाला होता. मात्र, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संशयितांनी त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून त्याचे अपहरण केले.

त्यानंतर त्याला रेठरे व कासेगाव येथे विविध ठिकाणी नेऊन दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी गज, लाकडी दांडके व पीव्हीसी पाइपने बेदम मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रहिमतुल्ला याला संशयीतांनी त्याच्या घरी सोडले. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील यांनी नातेवाइकांकडून घटनेचे माहिती घेतली. तसेच कऱ्हाड ग्रामीण व कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रेठरे, वाठार व कासेगाव येथे शोधमोहीम राबवून संशयितांना ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करीत आहेत.

प्रेमसंबंधाच्या संशयावरून मारहाण

संशयितांपैकी एकाच्या नातेवाईक युवतीशी रहिमतुल्ला याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून रहिमतुल्ला याला यापूर्वी धमकावण्यात आले होते, तसेच सोमवारी दुपारीही याच संशयावरून संशयितांनी रहिमतुल्ला याचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण केल्याचे आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.

Web Title: Youth murdered on suspicion of love affair in vathar Satara district, seven suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.