Satara Crime: मध्यरात्री विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण केली, शिरवळ येथील तरुणाचा मृत्यू; अपघात दाखविण्याचा केला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:05 IST2025-12-29T13:05:14+5:302025-12-29T13:05:33+5:30
ग्रामस्थांनी आज, सोमवारी शिरवळ बंदची हाक दिली

Satara Crime: मध्यरात्री विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण केली, शिरवळ येथील तरुणाचा मृत्यू; अपघात दाखविण्याचा केला बनाव
शिरवळ : शिरवळ येथील तरुणाला शनिवार, दि. २७ रोजी मध्यरात्री पळशीसह विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी करीत अपघात दाखविण्याचा बनाव केला होता. दरम्यान जखमी तरुणाचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतिश अशोक राऊत (वय २३, रा. जुनी माळआळी, शिरवळ ता. खंडाळा) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, इतरांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेसह शिरवळ पोलिसांची तपास पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याकरिता शिरवळ ग्रामस्थांनी सोमवार, दि. २९ रोजी शिरवळ बंदची हाक दिली आहे.
शिरवळ येथील अशोक दिनकर राऊत हे शिरवळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा आतिश हा कवठे येथील एका कंपनीमध्ये कार्यरत होता. शनिवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान पळशी येथील नातेवाइकांनी दूरध्वनीद्वारे अशोक राऊत यांना कळविले की, पळशीतील युवकांनी आतिशला मारहाण केली आहे. तुम्ही लवकर पळशीला या.’ मात्र अशोक राऊत यांनी नातेवाइकांना आतिशला शिरवळच्या रुग्णालयात पाठविण्याची विनंती केली.
अशोक राऊत हे मध्यरात्री अडीचच्या दरम्यान शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता गंभीर जखमी आतिशचे कपडे फाटलेले, डोळ्याखाली, तोंडाला, डोक्याला व मार लागल्याचे दिसत होते. रक्त येत होते. यावेळी वडील अशोक राऊत यांना आतिश याने पळशी येथील युवकांनी मारहाण केल्याचे सांगत तो बेशुद्ध झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आतिशची तपासणी करत पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून पुण्याला पाठविण्यात आले. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आतिशचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळी फलटण पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, शिरवळचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. सातारा येथील फॉरेन्सिक विभागाकडून घटनास्थळाची तपासणी केली आहे. अशोक राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत अज्ञात कारणावरुन तेजस भरगुडे, भाऊ दीपक भरगुडे व इतरांनी आतिश याला मारहाण केल्याचे म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के तपास करीत आहेत.
आई देवदर्शनासाठी परराज्यात
आतिश राऊतचा पळशी येथील युवकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर याबाबतची कल्पना देवदर्शनासाठी परराज्यात गेलेल्या आईला देण्यात आली नाही. लवकर येण्यास सांगितले आहे.