Satara Accident: अजिंक्यतारा किल्ल्यावरून दोनशे फूट दरीत पडून कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:50 IST2026-03-04T15:49:14+5:302026-03-04T15:50:08+5:30
किल्ल्याच्या कठड्यावर झोपले होते. अचानक तोल गेल्याने तब्बल दोनशे फूट खोल दरीत पडले

Satara Accident: अजिंक्यतारा किल्ल्यावरून दोनशे फूट दरीत पडून कामगाराचा मृत्यू
सातारा : येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून दोनशे फूट दरीत पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. नामदेव रमाजी गबाले (५८, रा. आसना मंचर, पुणे) असे किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजिंक्यताऱ्यावर किल्ल्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय मंगळवढेकर (४६, रा. मंचर आंबेगाव, पुणे) यांनी काही मजूर अजिंक्यतारा किल्ल्यावर कामासाठी आणले आहेत. नामदेव गबाले हेसुद्धा अजिंक्यतारा किल्ल्यावर कामगार म्हणून आले होते.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या कठड्यावर ते सकाळी झोपले होते. त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेल्याने ते तब्बल दोनशे फूट खोल दरीत पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यू टीमला समजल्यानंतर जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी दरीत उतरून गबाले यांचा मृतदेह दरीतून वर काढला.
त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. याबाबत बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय मंगळवढेकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार मोरे अधिक तपास करीत आहेत.