Satara Crime: प्रेम प्रकरणातून महिलेवर कोयत्याने वार, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:55 IST2025-02-14T15:55:36+5:302025-02-14T15:55:51+5:30

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Woman stabbed with a scythe over a love affair in Malkapur Satara district | Satara Crime: प्रेम प्रकरणातून महिलेवर कोयत्याने वार, हल्लेखोर पसार

Satara Crime: प्रेम प्रकरणातून महिलेवर कोयत्याने वार, हल्लेखोर पसार

कऱ्हाड/मलकापूर : प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले. मलकापूर-आगाशिवनगर येथे भरवस्तीत काल, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कोयता हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रवींद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर), असे हल्लेखोराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत जखमी महिलेच्या वडिलांनी कऱ्हाड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आगाशिवनगर येथील एका महिलेचा विवाह झाला असून, नवऱ्यासोबत झालेल्या वादामुळे ती महिला आई-वडिलांकडे राहते. तिला तीन अपत्य आहेत. संबंधित महिलेचा रवींद्र याच्याशी पूर्वीचाच परिचय आहे. या परिचयातून त्यांची ओळख वाढून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गुरुवारी सायंकाळी रवींद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर रवींद्रने महिलेवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याने केलेला वार तिच्या कानापासून जबड्यापर्यंत गेला आहे. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कृष्णा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हल्लेखोर रवींद्र पवार तेथून पळून गेला आहे. त्याचा शोध पोलिसांची तीन पथके घेत आहेत. पीडित महिलेच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

हल्लेखोराच्या शोधासाठी श्वान पथक

महिलेवर हल्ला केल्यानंतर संशयित रवींद्र पवार हा तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी संशयिताचा शोध घेतला. मात्र, तो हाती लागला नाही. सायंकाळी हल्लेखोराच्या शोधासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला.

Web Title: Woman stabbed with a scythe over a love affair in Malkapur Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.