भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीची कारला धडक; महिला गंभीर जखमी, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:25 IST2025-09-01T13:24:54+5:302025-09-01T13:25:21+5:30
उभ्या कारला दुचाकी पाठीमागून धडकली

भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीची कारला धडक; महिला गंभीर जखमी, साताऱ्यातील घटना
सातारा : पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून दुकानात जात असतानाचा भटकी कुत्री मागे लागले. त्यामुळे भयभीत होऊन महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी उभ्या कारली जोरदार धडकली. यामध्ये संबंधित महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताची नोंद पोलिसात झालेली नाही.
सदर बझार येथील म्हाडा कॉलनीजवळून संबंधित महिला दुचाकीवरून रविवारी (दि. ३१) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात होती. त्या महिलेच्या गाडीच्या मागे भटकी कुत्री लागल्यामुळे महिला भयभीत झाली आणि दुचाकीचा वेग वाढविला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या चारचाकी वाहनाला जाऊन जोरदार धडकली, या धडकेत चारचाकीच्या मागील भागाचा व दुचाकीचा चुराडा झाला.
अपघातात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून, महिलेच्या तोंडाला, हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. या महिलेला साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर बझार म्हाडा कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, यासंदर्भात वारंवार बंदोबस्त करण्याची मागणी करूनदेखील पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, असे येथील रहिवासी नानासाहेब घाडगे यांनी सांगितले.