Satara: भरदुपारी शिवथर येथे महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:19 IST2025-07-08T14:17:30+5:302025-07-08T14:19:16+5:30
घटनास्थळी शस्त्र नाही सापडले..

Satara: भरदुपारी शिवथर येथे महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
शिवथर : शिवथर (ता. सातारा) येथील गुजाबा वस्तीवरील पूजा प्रथमेश जाधव (वय ३०) या महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी भरदुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले. हा खून कोणी व कोणत्या कारणातून केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांची पथके तपासासाठी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा जाधव हिचा सुमारे १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पती प्रथमेश हा साताऱ्यातील एका दुकानात काम करतो. सोमवारी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामावर गेला तर सासू-सासरे शेतात आणि पाचवी इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. पूजा घरात एकटीच होती. दुपारी चारच्या सुमारास तिचे सासरे घरी आले. त्यावेळी पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले.
यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. वस्तीवरील लोक त्यांच्या आवाजाने त्यांच्या घराजवळ आले. पूजाचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यानंतर काहींनी या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमसह ठसेतज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला.
ज्या वस्तीवर ही घटना घडली, त्या वस्तीवर पाच ते सहा घरे आहेत. दुपारच्या सुमारास या वस्तीवरील लोक शेतात गेले होते. त्यावेळी हा खून झाल्याचे समोर आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
घटनास्थळी शस्त्र नाही सापडले..
पोलिसांनी घटनास्थळ व घराच्या आजूबाजूने सर्वत्र शोध घेतला. मात्र शस्त्र सापडले नाही. शिवथरपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर सातारा-मालगाव रस्त्यावर गुजाबा वस्ती आहे. या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहेत. एखाद्या सीसीटीव्हीत तरी हल्लेखोर कैद झाला असावा, यादृष्टीने पोलिस तपासणी करत आहेत.