कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ट्रकने महिलेला चिरडले, पाठलाग करून ट्रकसह ट्रकचालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:39 IST2026-01-28T17:39:38+5:302026-01-28T17:39:53+5:30
कोल्हापूर नाक्यावर आठवड्यात दुसरा बळी..

कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ट्रकने महिलेला चिरडले, पाठलाग करून ट्रकसह ट्रकचालक ताब्यात
मलकापूर : ट्रकने धडक देत महिलेला चिरडल्याने ती जागीच ठार झाली. येथील कोल्हापूर नाक्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातातील ट्रकचालक ट्रक घेऊन पसार होत असताना पाठलाग करून गोटेगावच्या हद्दीत संबंधित ट्रक थांबवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
नंदा रामचंद्र पवार (रा. दिवटे गल्ली, कराड) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिवटे गल्ली कराड येथील नंदा पवार या एका मुलाच्या (मुलाचे नाव समजू शकले नाही) दुचाकीवरून कराडमध्ये निघाले होते. ते कोल्हापूर नाक्यावर आले असता, पाठीमागून ट्रक (जीजे १६ एवाय ३८६२) ने दुचाकीला धडक दिली. या धडकेत नंदा पवार या दुचाकीवरून खाली पडल्यामुळे ट्रकच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पैलवान अमृत बाबर, दस्तगिरी आगा, महेश फल्ले, सुनील कदम, अशोक कचरे, रामचंद्र सरगर, आनंदा लोळे, सतीश माळी यांच्यासह कोल्हापूर नाक्यावर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कराड शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. पंचनामा करून बाबर यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघाताची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पाठलाग करून ट्रकसह ट्रकचालक ताब्यात..
अपघातानंतर संबंधित ट्रकचालक ट्रकसह पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचा नागेश कुरले यांनी दुचाकीवरून धाडसाने पाठलाग करून गोटे गावच्या हद्दीत संबंधित ट्रकसह ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात दिले.
कोल्हापूर नाक्यावर आठवड्यात दुसरा बळी..
कोल्हापूर ते सातारा लेनवर दहा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात मलकापुरातील एकजण ठार झाला होता. दहा दिवसांतच मंगळवारी ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन महिला जागीच ठार झाली. केवळ दहा दिवसांतच दोन अपघात होऊन दोन बळी गेल्यामुळे हे ठिकाण डेंजर झोन बनत आहे.