एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:52 IST2025-11-22T18:50:59+5:302025-11-22T18:52:47+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींचा साक्षीदार ठरला

एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
महाबळेश्वर : नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींचा साक्षीदार ठरला. राष्ट्रवादीने बंडखोरी यशस्वीपणे मोडून काढली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मानलेल्या भगिनी आणि माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी उमेदवारी मागे घेऊन थेट अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महत्त्वाचा राजकीय धक्का दिला.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली. मात्र, तिकीट न मिळाल्याने नासिर मुलाणी यांनी बंडाचा झेंडा उचलला होता. मंत्री मकरंद पाटील यांनी शुक्रवारी महाबळेश्वरात येऊन मुलाणी यांची समजूत काढली. त्यामुळे मुलाणी यांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे राष्ट्रवादीचा अंतर्गत संघर्ष थांबला आणि संघटन एकसंघ राहिले.
नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार होते. त्यापैकी राष्ट्रवादीचे बंडखोर नासिर मुलाणी आणि उद्धव ठाकरे गटाचे राजेश कुंभारदरे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ५ उमेदवार अंतिम शर्यतीत राहिले असून, प्रत्यक्षात तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे. २० नगरसेवक जागांसाठी ८३ उमेदवारांनी ११४ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २० अर्ज मागे घेतल्यानंतर आता ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक ताकदीने उतरत नगराध्यक्षपदासह २० पैकी २१ ठिकाणी उमेदवार देण्यात यशस्वी ठरली. अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या लोकमित्र जनसेवा आघाडीला केवळ ५ उमेदवार मिळाले. सत्ताधारी भाजपला शोधूनही उमेदवार मिळाले नाहीत, केवळ ३ उमेदवार कमळ चिन्हावर रिंगणात राहिले.
शिंदे गटाची पीछेहाट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक इच्छुकांनी शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर लढण्याऐवजी ‘अपक्ष’ म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यामुळे शिंदे गटाची सत्ता समीकरणे कोलमडली असून, अंतर्गत नाराजीची जाणीव बाहेर आली आहे.
विमल ओंबळे प्रवेशाचा ‘राजकीय टायमिंग’ खास
सातारा दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भगिनी विमल ओंबळे यांची जबाबदारी स्थानिक नेते कुमार शिंदे यांच्याकडे सोपवली होती. परंतु, दोन दिवसांपूर्वीच कुमार शिंदे यांनी अचानक त्यांचा पाठिंबा काढून प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांच्याशी हातमिळवणी केली. ही बाब ओंबळे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर घातली. मात्र, तिकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या नाराज होत्या. अखेर त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जाहीर केला.
कोणत्या प्रभागात कोणाने उमेदवारी मागे घेतली
प्रभाग १ अ : सूरज आखाडे, आशा ढेब
प्रभाग २ ब : अर्चना पाटणे, सुनीता आखाडे, आशा ढेब
प्रभाग ३ अ : आशा ढेब
प्रभाग ३ ब : प्रवीण जिमन
प्रभाग ४ अ : सुमित कांबळे
प्रभाग ४ ब : पूजा उतेकर, विमलताई ओंबळे
प्रभाग ५ अ : सुरेखा देवकर
प्रभाग ५ ब : विजय नायडू, विशाल कुंभारदरे
प्रभाग ६ अ : सतीश ओंबळे, समीर सुतार
प्रभाग ८ ब : अश्विनी वायदंडे
प्रभाग ८ ब : राजेश कुंभारदरे
प्रभाग ९ ब : समीर सुतार
प्रभाग १० अ : लता आरडे
प्रभाग १० ब : संदीप कोंढाळकर