विलीनीकरण कोणाचे अन् कोणत्या पक्षात होणार?, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:26 IST2026-02-03T16:23:57+5:302026-02-03T16:26:18+5:30
‘खलनायक’ ठरत असल्याचा आरोप फेटाळले...

विलीनीकरण कोणाचे अन् कोणत्या पक्षात होणार?, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत
कराड : ‘महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी भाजप व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरीत्या घेतला आहे. ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः ‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार ?’ याबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. राष्ट्रवादीची भूमिका अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आधीच निश्चित झालेली असून, त्याच मार्गाने वाटचाल करणे, हे आमचे कर्तव्य आहे,’ असे मत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
कराड येथे वेणुताई चव्हाण स्मारकास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. तटकरे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी सुनेत्रा पवार कराड येथे आल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाने गेल्या अडीच वर्षांत केलेली वाटचाल लक्षात घेता, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर सुनेत्रा पवार योगदान देतील, असा आम्हाला विश्वास आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने गिळंकृत केल्याचे संजय राऊत म्हणतात याबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, ‘अशा टीका-टिप्पण्यांना फारसे महत्त्व नाही. राष्ट्रवादी (अजित पवार)ने दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीए सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभा निवडणुकीत १३ कोटी जनतेने या भूमिकेला कौल दिला आहे.
शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिल्यानंतरही अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया का येत नाहीत? याबाबत छेडले असता तटकरे म्हणाले, ‘विलीनीकरणाबाबत कोण काय प्रतिक्रिया देतो, यावर बोलणार नाही. मात्र, कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार, याचा खुलासा आधी झाला पाहिजे. त्यानंतरच यावर स्पष्ट भूमिका मांडता येईल.
राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार हा निवडून आलेल्या सदस्यांनाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणासंदर्भात यापूर्वी झालेल्या चर्चा पुराव्यांसह समोर आणण्याच्या दाव्यावर बोलताना, वेळ आल्यावर योग्य वेळी या विषयावर भूमिका मांडली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.
काँग्रेसमध्येच पळवा-पळवी सुरू...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत, यासाठी कट रचला जात असल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर तटकरे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. आधी काँग्रेसने चंद्रपूरचा महापौर कोणाचा होतोय ते पाहावे. काँग्रेसमध्येच पळवा-पळवी सुरू असताना वडेट्टीवार यांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
‘खलनायक’ ठरत असल्याचा आरोप फेटाळले...
सध्याच्या सर्व घडामोडींमध्ये आपण आणि प्रफुल्ल पटेल ‘खलनायक’ ठरत असल्याचा आरोप होत आहे, याकडे लक्ष वेधले असता सुनील तटकरे म्हणाले, भाजपने कधीही आमच्या पक्षाचे निर्णय ठरवलेले नाहीत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र भूमिका घेणारा आहे.
ब्लॅक बॉक्समधून दुर्घटनेबाबत माहिती समोर येईल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत व्यक्त होत असलेल्या संशयांवर तटकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयानेही चौकशी सुरू केली असून, ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या दुर्घटनेमागील सत्य महाराष्ट्र व देशातील जनतेसमोर आले पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे.’