Satara- Phaltan Doctor Death: मंत्री गोरेंना चॅट वाचायचा अधिकार कोणी दिला, संध्या सव्वालाखे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:40 IST2025-11-03T13:37:51+5:302025-11-03T13:40:58+5:30
प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास होईल की नाही? याबाबत शंकाच

Satara- Phaltan Doctor Death: मंत्री गोरेंना चॅट वाचायचा अधिकार कोणी दिला, संध्या सव्वालाखे यांचा सवाल
सातारा : पीडित डॉक्टर युवतीच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असताना तिला डॉक्टर बनवले. मात्र, व्यवस्थेने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तिच्याविषयी अपशब्द वापरले जातात. मुख्यमंत्री येथे येऊन संबंधितांना क्लीन चीट देतात. या प्रकरणाचा तपास नेमकं कोण करतंय? हे कळेनासे झाले आहे. मंत्री जयकुमार गोरेंसह सरकारचे मंत्री तपास अधिकारी, जज्ज असल्यासारखे वक्तव्य करत आहेत. त्यांना चॅट वाचायचा अधिकार कोणी दिला? असा संतप्त सवाल राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी येथे केला.
सातारा जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणानंतर पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. आंदोलनाचा रविवारी दुसरा दिवस होता, त्याला पाठिंबा देण्यासाठी त्या सातारा येथे आल्या होत्या. त्यावेळी सव्वालाखे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, प्रदेश सरचिटणीस उज्ज्वला साळवे, ॲड. मनीषा रोटे आदी महिला उपस्थित होत्या.
सव्वालाखे म्हणाल्या, ‘डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर येऊन गेल्यानंतर त्यांनी वक्तव्य केले. ते निषेधार्ह आहे, रुपाली चाकणकर यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा. आत्महत्येचा प्रकार सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला, मग त्या डॉक्टर युवतीचा मोबाइल अकरा वाजता ऑनलाइन कसा? हा प्रश्न आहे.
आत्महत्येपूर्वी युवतीने हातावर लिहिलेला जो पेन आहे तो पोलिसांनी जमा केला आहे का? केला असल्यास पोलिसांनी त्याचा खुलासा करावा. नुकत्याच या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या तपासी अधिकाऱ्यांनी यापूर्वी याठिकाणी काम केले असल्याने त्यांच्यावरही दबावाची दाट शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास होईल की नाही? याबाबत शंकाच आहे.