Satara ZP: भाजपचं टेन्शन वाढवून 'राष्ट्रवादी' टूरवर..!, सातारा झेडपीचा सत्तासंघर्ष वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:59 IST2026-02-17T16:58:48+5:302026-02-17T16:59:04+5:30
शिंदेसेनेचे सदस्यही सुरक्षित !

Satara ZP: भाजपचं टेन्शन वाढवून 'राष्ट्रवादी' टूरवर..!, सातारा झेडपीचा सत्तासंघर्ष वाढला
कराड : सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच झाली आहे. मात्र कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. भाजपला बाजूला ठेवत शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याचे दिसते. पण मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा दावा केल्याने महायुतीत तणाव वाढला आहे. त्यामुळेच सोमवारी राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी करताच सायंकाळी बहुतांश सदस्य एका खास गाडीतून टूरवर पाठवल्याने भाजप समोरचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत एकहाती सत्ता ताबा घेण्याची गर्जना केली होती. मात्र राष्ट्रवादी व शिंदेसेनेने त्यांच्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक लावला. २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्ता स्थापन करता येईना. याउलट राष्ट्रवादीच्या २० तर शिंदेसेनेच्या १५ जागा मिळून ते संख्याबळाचा आकडा गाठत आहेत. यामुळेच जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
कोणत्याही परिस्थितीत सत्तास्थापन करण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवायला सुरुवात केली आहे. मात्र हेच लक्षात घेऊन इंप्रेशन लोटसची धास्ती घेऊन राष्ट्रवादी व शिंदेसेना या दोघांनी गटांची स्वतंत्रपणे नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भाजपने देखील गटनोंदणी केली आहे. त्यामुळे आता हा सत्तासंघर्ष नेमके कुठपर्यंत पोहोचणार आहे? याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गटनोंदणी झाल्यानंतर एका आलिशान हॉटेलात ‘प्रीती’भोजन घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच सदस्यांना मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी टूरवर पाठवले आहे. त्यामुळे त्याचीच चर्चा सध्या सुरू आहे.
शिंदेसेनेचे सदस्यही सुरक्षित !
दरम्यान, शिंदेसेनेच्या सर्व सदस्यांची नोंदणी २ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. त्यावेळेपासून शिंदेसेनेचे सदस्य देखील सुरक्षित ठिकाणी असल्याचे सांगितले जाते.