"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 22:22 IST2025-10-26T22:19:55+5:302025-10-26T22:22:42+5:30
Phaltan Doctor case in Marathi: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या मृत्यू आणि अत्याचार प्रकरणात निलंबित पीएसआयला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या वकिलांनी मृत डॉक्टर तरुणीने केलेले बलात्काराचे आरोप मोघम असल्याचा युक्तिवाद कोर्टासमोर केला.

"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
Phaltan Doctor Death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निलंबित पीएसआय गोपाळ बदने याला सह दिवाणी न्यायाधीश ए.एस. साटोटे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आरोपीच्या वकिलाने मृत तरुणीने बदने याच्यावर केलेले बलात्काराचे आरोप मोघम असल्याचा युक्तिवाद केला. पोलिसांनी आरोपीची सात दिवसांची कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पोलिसांच्या वतीने सरकारी वकील सुचिता वायकर-बाबर यांनी, तर आरोपी गोपाळ बदने याच्या वतीने राहुल धायगुडे यांनी युक्तिवाद केला. गोपाळ बदने याचा या कोणताही दोष नाहीये, त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे धायगुडे पोलीस कोठडीला विरोध करताना म्हणाले.
लैंगिक अत्याचाराची माहिती दोघांनाच
सरकारी वकील सुचिता वायकर-बाबर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे. महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणारा आहे. मोबाईल जप्त करण्यासाठी डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. सुसाईड नोट मध्ये असलेल्या बलात्काराचा उल्लेख तपासायचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेची माहिती दोघांनाच होती. त्यातील एक व्यक्ती मयत (डॉक्टर तरुणी) असल्याने गुन्हा झालेली ठिकाणे, पद्धत या सगळ्यांचा तपास करायचा आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
गोपाळ बदनेच्या वकिलांनी केला विरोध
आरोपी गोपाळ बदनेचे वकील म्हणाले, "एफआयआरमधील नोंदी विरोधाभासी आहेत. दोन गुन्हे असताना एकच एफआरआय करण्यात आला आहे. सुसाईड नोटमध्ये अत्याचाराचा आणि छळवणूक केल्याचा उल्लेख प्रशांत बनकरच्या संबंधाने आहे. चार महिने त्यांच्यात लग्न करण्यावरून वाद सुरु होते."
"पीडित महिला आरोपी क्रमांक एकच्या (प्रशांत बनकर) घरी राहत होती. आत्महत्या करायला ती हॉटेलमध्ये का आली? तिला बाहेर जायला प्रवृत्त करण्यात आलं होतं का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. आरोपी दोनला (गोपाळ बदने) बळीचा बकरा बनवण्यात आले आहे", असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला.
...त्यावेळी बलात्काराची तक्रार केली गेली नव्हती
गोपाळ बदनेच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले की, "मयत डॉक्टरकडे पोलीस अटक केलेल्या आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले होते. माझी ड्युटी असतानाच आरोपींना का आणता यावरून वाद झाले होते. २५ जून रोजी दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी बलात्काराची तक्रार केली गेलेली नाही."
"आरोपी एकमुळे (प्रशांत बनकर) आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचं सुसाईडनोटमधून लक्षात येत आहे. पण, जाता जाता आरोपी दोनला अडकवण्याचा प्रयत्न म्हणून त्याचे नाव टाकण्यात आले आहे. संबंधित पीडितेला बलात्कार झाला असेल, तर त्याची वेळ ठिकाणं, सगळं नोंदवता आलं असतं; पण सुसाईड नोटमधील आरोप वेगळा आहे. सुसाईड नोटची सत्यताच प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे मोबाईल जप्त करणे, गाडीसाठी एक दिवस पुरेसा आहे", असा युक्तिवाद गोपाळ बदनेच्या वकिलांनी केला.
त्यावर सरकारी वकील म्हणाल्या, "सुसाईड नोट ही डाईंग डिक्लेरेशन (मृत्यूपूर्वीचा खुलासा) असल्याने सत्यच समजण्यात येते. मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. त्यामुळे यावर शंका घेणं आरोपीच्या वकिलांचा चुकीचा मुद्दा आहे." युक्तिवादानंतर न्यायालयाने बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.