On the way from Pandharpur to Satara, Type: Chaughajan grabs a serious, tangled dumper | मद्यधुंद कारचालकाने नऊजणांना ठोकरले; गोंदवलेत डंपर आडवा लावून पकडले
मद्यधुंद कारचालकाने नऊजणांना ठोकरले; गोंदवलेत डंपर आडवा लावून पकडले

ठळक मुद्दे पंढरपूरहून साताऱ्याकडे जाताना प्रकार : चौघेजण गंभीर,

म्हसवड : पंढरपूरहून साता-याकडे जाताना मंगळवारी रात्री मद्यपी वाहनचालकाने पिलीव ते गोंदवलेदरम्यानच्या अंतरात ८ ते ९ जणांना ठोकरले. त्यातील चौघेजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मद्यधुंद चालकाचा म्हसवड पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर गोंदवलेत मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने डंपर अडवा लावून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, दि. १९ रोजी रात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील मुख्य रस्त्यावर सामसूम होत चालली असतानाच मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह भास्कर कट्टे यांच्याशी म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी संपर्क साधला. एक चारचाकी रस्त्याने वाहनांना ठोकरत येत असल्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर गोंदवले ग्रामस्थांनाही ही माहिती समजताच वेगाने अपघात करत निघालेल्या वाहनाला अडविण्यासाठी धावपळ सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला.

अपघाताला कारणीभूत ठरणारे वाहन थांबविण्यासाठी सातारा-पंढरपूर या मुख्य रस्त्यावरच धैर्यशील पाटील यांनी स्वत:चा डंपर आडवा उभा केला. काही मिनिटांतच (एमएच ११ सीजी ३६६०) ही पांढºया रंगाची चारचाकी वेगाने येताना दिसली. त्याचक्षणी तातडीने ही गाडी थांबविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. रस्त्यावरच डंपर आडवा लावल्यामुळे चालकाला गाडी थांबविण्याशिवाय पर्यायच नव्हता. चालक हणमंत तात्यासो गेजगे (वय ३५, रा. कारखेल, ता. माण) याने गाडी थांबविताच लोकांनी गराडा घातला. परंतु गाडीची दारे व काचा बंद होत्या. त्यातच वाहन सुरूच असल्याने धोका अधिकच वाढला होता. मात्र, याचवेळी धाडसाने धैर्यशील पाटील यांनी वाहनावर उभे राहून चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले. तरीही चालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर काचा फोडून गाडी बंद करण्यात आली.

चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला. याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लोकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघात करत आलेल्या वाहनाचा म्हसवडमधूनच बंटी माने व त्यांच्या सहकाऱ्यांनीही पाठलाग सुरू केला होता. मात्र, गोंदवल्यात हे वाहन थांबविल्यानंतर त्यांचाही पाठलाग थांबला.

दरम्यान, या वाहनाने वीरकरवाडी (ता. माण) येथील दोघांना पिलीव घाट परिसरात उडवून गंभीर जखमी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी संपूर्ण प्रवासादरम्यान आणखी कितीजणांना अपघातग्रस्त केले? याबाबत मात्र सविस्तर माहिती मिळालेली नव्हती.

म्हसवड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन व चालकाला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत. या थरारक पाठलागात म्हसवड पोलीस ठाण्याचे किरण चव्हाण, सूरज काकडे, संजय अस्वले, अनिल वाघमोडे, कुंभार सहभागी झाली होते.


सोलापूर जिल्ह्यातील उपरी (ता. पंढरपूर) पासून सुरू झालेली अपघाताची मालिका गोंदवल्यातील सतर्क नागरिकांमुळे संपली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. परिणामी मोठा अनर्थ टळला. या थरारात चालक हणमंत गेजगे याने दोनजणांना ठोकरल्याची माहिती मिळत असली तरी या भरधाव प्रवासात ८ ते ९ जणांना ठोकरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: On the way from Pandharpur to Satara, Type: Chaughajan grabs a serious, tangled dumper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.